Custom Heading

'डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व' कॉन्फरन्स विरोधातील बैठकीला नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेशसह देशभरातील हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वतीने ऑनलाईन ‘हिंदुत्व रक्षा बैठक’ संपन्न ! मुंबई, १३ सप्टे
against Dismantling Global Hindutva Conference hindu meeting


‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वतीने ऑनलाईन ‘हिंदुत्व रक्षा बैठक’ संपन्न !

मुंबई, १३ सप्टेंबर (हिं.स.) : 10 ते 12 सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेत झालेल्या ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या परिषदेमधून डाव्या अन् धर्मांध विचारसरणीच्या वक्त्यांनी हिंदु धर्माच्या विरोधात वैचारिक आतंकवाद आणि द्वेष पसरवला. हिंदुत्वाच्या विरोधात षड्यंत्रपूर्वक प्रसारित करण्यात येत असलेल्या द्वेषाला रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी संघटित प्रयत्न करायला हवेत, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने ‘हिंदुत्व रक्षा बैठकी’चे आयोजन केले होते. समितीच्या वतीने प्रतीवर्षी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले जाते, या अधिवेशनाचा भाग म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत हिंदुत्वाच्या विरोधात होणार्या प्रत्येक षड्यंत्राला तत्काळ आणि सर्व स्तरांवर विरोध करायला हवा, असे विचारवंत, लेखक, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख आदींनी एकमताने निश्चित केले, तसेच पुढील संघटित कार्याची दिशाही निश्चित केली. 12 सप्टेंबरच्या रात्री 8.30 वा. ‘गुगल मीट’च्या माध्यमातून झालेल्या ‘हिंदुत्व रक्षा बैठकी’ला या बैठकीला भारतभरातील विविध राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांतून 60 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, संत, अधिवक्ते, विचारवंत, लेखक आदी सहभागी झाले होते.

या बैठकीमध्ये ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी परिषदेला साहाय्य करणारे, त्यांचे प्रायोजक, आयोजक, वक्ते आणि पाठिंबा देणार्या संस्था यांच्या विरोधात कृती करण्याचे निश्चित झाले. यामध्ये जगभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने करणे; पोलीस तक्रारी करणे; स्थानिक आमदार-खासदार, केंद्रीय मंत्री, परराष्ट्रमंत्री, राष्ट्रपती आदींना भेटून निवेदन देणे; हिंदुत्वावर केलेल्या आरोपांचे वैचारिक खंडण करणे; विदेशातील हिंदु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या दूतावासाला पत्र पाठवणे; ‘सोशल मीडिया’च्या माध्यमांतून अशा कॉन्फरन्सला विरोध करणे आदी कृती करण्याचा सर्वानुमते निर्धार व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला नेपाळ येथील माजी राजगुरु श्री. माधव भट्टराय, श्रीलंका येथील ‘शिव सेनाई’चे अध्यक्ष एम्. सच्चिथानंदन, ‘बांग्लादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता (पू.) रवींद्र घोष, ‘शदानी दरबार’चे डॉ. (पू.) युधिष्ठिरलालजी महाराज, पश्चिम बंगाल येथील ‘शास्त्रधर्म प्रचार सभे’चे (पू.) शिवनारायण सेन, ‘श्रीराम सेने’चे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, ‘रुट्स इन काश्मीर’चे श्री. सुशील पंडित, ‘शिवसेने’चे तामिळनाडू राज्यप्रमुख राधाकृष्णन्, झारखंड येथील ‘तरुण हिंदू’चे डॉ. नील माधव दास, ‘युथ फॉर पननू काश्मीर’चे श्री. राहूल कौल, ‘वारकरी पाईक संघा’चे ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, ‘लष्कर-ए-हिंद’चे अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल, केरळ येथील ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’चे श्री. बिनील सोमसुंदरम्, बिहार येथील ज्योतिषी आचार्य अशोक कुमार, राजस्थान येथील दीपक गोस्वामी आदी अनेक मान्यवर मंडळी या वेळी उपस्थित होती.

प्रारंभी हिंंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी या बैठकीची प्रस्तावना करतांना ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ याविरोधात आतापर्यंत दिलेल्या लढ्याविषयी उपस्थितांना अवगत केेले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले.

या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी समारोपीय मार्गदर्शन करतांना सांगितले की, 9/11 या दिवशी अमेरिकेत आतंकवादी आक्रमण झाल्यावर सर्व लोक मुसलमानांकडे संशयाने पाहू लागले. तीच दृष्टी हिंदूंविषयी निर्माण करण्यासाठी ही हिंदुविरोधी परिषद घेतली गेली. त्यामुळे हिंदूंनी सतर्क झाले पाहिजे. त्याला वैचारिक आणि बौद्धीक स्तरावर अभ्यासपूर्ण उत्तर दिले पाहिजे. ईश्वरी कार्याला आशीर्वाद आणि यश प्राप्त झालेले असतेच, केवळ आपल्याला कृती करायची आहे.

या बैठकीत बोलतांना झारखंड येथील ‘तरुण हिंदू’चे संस्थापक श्री. नील माधव दास म्हणाले की, या हिंदुविरोधी परिषदेच्या मागे मुख्यतः ख्रिस्ती मिशनरी असून हिंदुत्वाला संपवण्यासाठी कम्युनिस्ट आणि कट्टरतावादी मुसलमान त्यांना साथ देत आहेत. याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करायला हवेत. ज्येष्ठ विचारवंत आणि ‘रूटस् इन कश्मीर’चे श्री. सुशील पंडित म्हणाले की, ज्या हिंदूंना या परिषदेविषयीचे सत्य माहिती नाही, ते त्यांच्या दुष्प्रचाराला बळी पडू शकतात. यासाठी आपण हिंदूंना सत्य सांगून जागृत केले पाहिजे. पूर्वी प्रसारमाध्यमे पूर्णपणे विरोधकांच्या हातात होती. आता परिस्थिती पूर्ण पालटली आहे. त्यामुळे हिंदु धर्म, संस्कृती, जीवनदृष्टी यांविषयी हिंदूंना शिक्षित केले पाहिजे. विरोधकांच्या आरोपांना पुरावे, तर्क आणि अभ्यास यांद्वारे सडेतोड उत्तरे दिली पाहिजेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande