विराट कोहली टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर, (हिं.स.) - लवकरच टी-२० वर्ल्ड कप सुरू होणार आहे. मात्र, त्या आधीच भारतीय सं
विराट कोहली


नवी दिल्ली, १६ सप्टेंबर, (हिं.स.) - लवकरच टी-२० वर्ल्ड कप सुरू होणार आहे. मात्र, त्या आधीच भारतीय संघासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटर हँडलवर विराटने पत्र ट्वीट केले असून यात त्याने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल लिहिले आहे. दरम्यान, आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचे विराटने या पत्रात म्हटले आहे.

विराटने आपल्या पत्रात म्हटले की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो. गेल्या ८ ते ९ वर्षांपासून टी-२०, वन डे आणि टेस्ट क्रिकेट या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मी खेळत आहे. तसेच ५ - ६ वर्ष या तिन्ही प्रकारात कर्णधार म्हणून मी काम केले आहे. आता मला स्वतःसाठी थोडा अवधी देण्याची गरज वाटते. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन.

विराट पत्रात पुढे म्हणतो, सर्वांशी चर्चा करूनच मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या जवळच्या व्यक्तींशी, रवीभाई (रवी शास्त्री) रोहित शर्मा यांच्याशी चर्चा करून मी या निर्णयाप्रत आलो आहे की, ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर मी भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त होईन. बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही माझ्या निर्णयाची कल्पना दिली आहे. भारतीय क्रिकेट आणि भारतीय संघाची सेवा मी अशीच करत राहीन, असेही विराटने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande