पुणे - महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा 'विशेष कृती आराखडा' - महापौर
पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.) - शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनां
पुणे - महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा 'विशेष कृती आराखडा' - महापौर


पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.) - शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांची महापालिका स्तरावरही गांभीर्याने दखल घेण्यात आली असून या संदर्भात पुणे महापालिका पुणे पोलिसांसमवेत 'विशेष कृती आराखडा' तातडीने तयार करणार असून त्याची अंमलबजावणीही वेगाने करण्यात येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत पुणे आणि परिसरात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेत पोलीस दलासमवेत बैठक आयोजित केली होती. त्यानंतर महापौर बोलत होते. या बैठकीमध्ये, महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध निर्णयांसोबतच क्षेत्रीय कार्यालयानिहाय पथके तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौर म्हणाले, 'सद्यस्थितीमध्ये नोकरी, व्यवसायात महिला वर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त महिलांना रात्री अपरात्री प्रवास करावा लागत असल्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत, असे निदर्शनास आले आहे. याला आळा घालण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या सूचनेनुसार शाळेची मैदानी, उद्याने, रेल्वे स्टेशन परिसर, स्वारगेट बस स्थानक, शिवाजीनगर बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा तसेच विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये संस्कार वर्ग, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, स्पर्शज्ञान यासाठी विशेष प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande