गांधीजींच्या स्वप्नातील भारत साकारण्याच्या दिशेने काम करण्याची वेळ - राष्ट्रपती
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला देशाल
President 


नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला देशाला संदेश दिला आहे. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, “महात्मा गांधी यांच्या 153 जयंतीनिमित्त मी सर्व देशवासीयांच्या वतीने राष्ट्रपित्याला आदरांजली अर्पण करते.

गांधी जयंती म्हणजे आपल्या सर्वांसाठी गांधीजींच्या प्रेरणादायी जीवनातील, शांतता, समता आणि सामाजिक सलोखा या मूल्यांप्रती स्वतःला पुन्हा एकदा समर्पित करण्याची संधी आहे. देश आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना यंदाच्या वर्षी हा दिवस साजरा करण्याला विशेष महत्त्व आहे. ही वेळ, आपल्या सर्वांसाठी गांधीजींच्या स्वप्नातील भारत साकार करण्याच्या दिशेने काम करण्याची आहे.

एका शतकापूर्वी गांधीजींनी स्वदेशीचा आग्रह धरून आणि आत्मनिर्भरतेवर भर देत लाखो लोकांना प्रेरित केले. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीची सुरु असलेली प्रक्रिया महात्मा गांधी यांच्या दृष्टिकोनाने प्रेरित आहे आणि हीच त्यांना खरी आदरांजली म्हणून अभिप्रेत आहे. त्यांच्या स्वप्नातील भारत हा स्वच्छ भारत आहे, सुदृढ भारत आहे. या संदर्भात केलेल्या प्रयत्नांना आता फळ मिळताना दिसत आहे.

स्वातंत्र्याच्या शतकपूर्ती पूर्वीच्या अमृत काळात आपण प्रवेश करत असताना युवा पिढी देखील गांधीजींच्या कामातून प्रेरणा घेत आहे, हे लक्षात घेणे आनंददायी आहे.जग जेव्हा अधिकाधिक गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जात आहे, त्यांचे जीवन एका दीपस्तंभाप्रमाणे काम करत आहे, जे आपल्याला खवळलेल्या समुद्रात वाट शोधायला मदत करत आहे.

गांधीजींनी समस्त मानवजातीला त्यांच्या क्षमतेची जाणीव करून दिली आणि करुणेची शक्ती सिध्द केली. आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेऊया, सत्य आणि अहिंसेचा मार्ग, जो परस्परांमधील सद्भावना वाढवेल आणि देशाच्या आणि जगाच्या प्रगतीसाठी काम करेल”.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande