तलवारबाजी स्पर्धेत अजिंक्य दुधारे, गिरीश जकातेला कांस्य पदक
महाराष्ट्र संघाची दोन पदकांची कमाई अहमदाबाद, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर
तलवारबाजी स्पर्धेत अजिंक्य दुधारे, गिरीश जकातेला कांस्य पदक


महाराष्ट्र संघाची दोन पदकांची कमाई

अहमदाबाद, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी खेळात अजिंक्य दुधारे व गिरीश जकाते या खेळाडूंनी महाराष्ट्र संघास दोन कांस्यपदके मिळवून दिली.

अजिंक्य दुधारे याने इप्पी प्रकारात वैयक्तिक साखळी सामन्यात चांगले प्रदर्शन करून बाद फेरीत प्रवेश मिळवला. बाद फेरीमध्ये केरळच्या आलिशियोस जोशी यास (15 -14 गुण ) अटीतटीच्या सामन्यात पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य फेरीमध्ये ओडिशाच्या प्रवीण कुमारचा (15 -6) गुणांनी सहज पराभव करीत अजिंक्य दुधारे याने उपांत्य फेरीत धडक मारली व पदक निश्चित केले.

उपांत्य फेरीमध्ये छत्तीसगडच्या सर्जन सोबत (9 -15) गुणांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अजिंक्य दुधारे याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

गिरीश जकाते याने इप्पी वैयक्तिक प्रकारात चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत बाद फेरीत प्रवेश मिळवला. बाद फेरीमध्ये तेलंगणाच्या वेमानीचा (15- 12) गुणांनी पराभव करीत त्याने उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. यामध्ये सेनादलाच्या बलाढ्य खेळाडू संतोष सिंग याचा (15 -10) गुणांनी पराभव करून गिरीश जकाते याने उपांत्य फेरी गाठली.

उपांत्य फेरीमध्ये पंजाबच्या उदयवीर सिंग सोबत (7-15) गुणांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे गिरीश जकातेला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

तलवारबाजी स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्र संघाने दोन कांस्य पदके जिंकून पदक तालिकेत पदकांची भर घातली. या कामगिरीवर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणीचे सदस्य व महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे, अशोक दुधारे, संघाचे प्रशिक्षक स्वप्नील तांगडे, संजय भुमकर, शोएब मोहंमद , प्रकाश काटोळे, राजकुमार सोमवंशी व नयना नायर यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र संघातील आणखी काही खेळाडू पदक जिंकतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी तलवारबाजी खेळातील दोन पदकांविषयी आनंद व्यक्त केला आहे. पदक तालिकेत तलवारबाजी खेळातील दोन पदकांची भर पडली आहे. आणखी काही पदके येत्या दोन दिवसांत खेळाडू जिंकतील असा विश्वास नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande