167 वर्षाची परंपरा लाभलेला हिंगोलीचा दसरा महोत्सव
167 वर्षांची परंपरा लाभलेला मराठवाड्यातील हिंगोली येथील दसरा महोत्सव देशवासीयांसाठी आकर्षण ठरला आहे.
167 वर्षाची परंपरा लाभलेला हिंगोलीचा दसरा महोत्सव


167 वर्षांची परंपरा लाभलेला मराठवाड्यातील हिंगोली येथील दसरा महोत्सव देशवासीयांसाठी आकर्षण ठरला आहे. यंदा हा महोत्सव दि. 25 सप्टेंबर ते 07 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. यावर्षी दसरा महोत्सवाचे 168 व्या वर्षात पदार्पण झालेले आहे. मागील दोन वर्षात सर्वत्र कोरोनाचे संकट असल्याने प्रातिनिधीक स्वरुपात श्री खाकीबाबा मठामध्ये रामलीला व रावण दहन कार्यक्रम मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत घेण्यात आले. सद्यस्थितीत कोरोनाचे संकट ओसरल्याने व सर्व नियम शिथील केल्याने बंधनमुक्त वातावरणात यावर्षीचा सार्वजनिक दसरा महोत्सव येथील रामलीला मैदानावर सुरु आहे. या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याचा इतिहास या लेखातून मांडण्यात आला आहे.

दसरा किंवा विजयादशमी म्हणजे सत्प्रवृत्तीने असत्यावर व सदगुणांनी दुर्गुणांवर मिळवलेला विजय होय. पौराणिक संदर्भानुसार श्रीरामाने रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशभरात विजयादशमी उत्साहाने साजरी केली जाते. कर्नाटकात म्हैसूर येथे वाडियार या राजघराण्याने सुरु केलेला दसरा महोत्सव देशातच नाहीतर जगभरात प्रसिध्द आहे. जवळजवळ तितकीच प्रदीर्घ परंपरा हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा महोत्सवाला लाभली आहे.

167 वर्षांची परंपरा लाभलेल्या हिंगोली व म्हैसूरच्या दसरा महोत्सवातील मुख्य फरक म्हणजे म्हैसूरच्या दसऱ्याला राजाश्रय लाभला, तर हिंगोलीच्या दसऱ्याला लोकाश्रय लाभलेला आहे. हा लोकाश्रय इतका उदार आहे की, म्हैसूरच्या दसरा महोत्सवानंतर क्रमांक दोनचा दसरा म्हणून हिंगोलीच्या दसऱ्याची देशपातळीवर दखल घेतली जाते.

हिंगोली हे विदर्भ व मराठवाडयाच्या सिमेवर कयाधू नदीच्या काठावर वसलेले एक शहर आहे. वंजारगढी म्हणून या शहराची एकेकाळी ख्याती होती. संत नामदेव महाराज, विठोबा खेचर, संत जनाबाई यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीला खाकीबाबा मठ, दत्तमंदीर, गोपाललाल मंदीर, खटकाळी हनुमान आदी देवस्थानांमुळे धार्मिक चेहरा प्राप्त झाला आहे.

कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठ म्हणजे आखाडा परंपरेतील मठ होय. या मठाचे संस्थापक महंत खाकीबाबा हे उत्तरेतील असल्याने ब्रिटीश छावणीत आलेल्या उत्तर भारतीय सैनिकांचा हा मठ श्रध्दास्थान बनले. संत मानदास महाराज, संत शिवरीदास महाराज ही ऋषितुल्य मंडळी या मठाचे मठाधिपती असल्याने त्यांच्याप्रती छावणीतील सैनिकांच्या मनात आदराचे स्थान होते. या संत मंडळींनी स्थानिक लोकांच्या अंत:करणातही आदराचे स्थान प्राप्त केले होते.

उत्तरेतून हिंगोलीत आलेली ब्रिटिश छावणीत वास्तव्य करणारी मंडळी ही सैनिकी पेशाची असल्याने त्यांच्या पेशाच्या परंपरेनुसार ती दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या शस्त्रास्त्रांची पूजा करीत असत. फार पूर्वी कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठ हा आखाडा परंपरेतील असल्याने तेथेही शस्त्रास्त्रे असत, तसेच त्या परिसरात राम मंदिर असल्याने दसऱ्याच्या दिवशीही ही मंडळी खाकीबाबा मठात जाऊ लागली. त्यातूनच मठाच्या आवारात रावण दहनाची परंपरा दसऱ्याच्या दिवशी सुरु झाल्याचे शहरातील जुनी-जाणती मंडळी सांगतात. नंतर ही पंरपरा हिंगोलीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. या उत्सवाची व्याप्ती वाढू लागताच मठाची जागा अपूरी पडू लागल्याने शहराच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या रामलीला मैदानावर या महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन होऊ लागले. आता हा महोत्सव हिंगोलीतील समस्त जाती-धर्मांच्या लोकांच्या सार्वजनिक जीवनाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे.

सन 1855 पासून म्हणजे 150 वर्षांहून जास्त परंपरा लाभलेल्या या महोत्सवाचे समस्त हिंगोलीवासियांनी अभिमानाने जतन केले आहे. भाद्रपद पोर्णिमेला दि. 25 सप्टेंबर रोजी बासा पूजन या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक दसरा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. घटस्थापना ते रामराज्यभिषेक या कालावधीत साजरा होणारा हा महोत्सव म्हणजे हिंगोलीकरांच्या एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण होय.

या महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. अलीकडच्या काळात व्हॉलीबॉल, लॉन-टेनिस, बॅडमिंटन, कब्बडी, कुस्ती आदी क्रीडा प्रकारांचेही आयोजन केले जाते. 1970 पासून या महोत्सवानिमित्त प्रदर्शनाच्या आयोजनाला सुरुवात झाली. सार्वजनिक दसरा महोत्सव समिती या प्रदर्शनाचे आयोजन करते. प्रदर्शनात विविध वस्तुंचे आकर्षक स्टॉल, आकाश पाळणे, मौत का कुव्वा, लहान मुलांसाठी विविध खेळ आदी मनोरंजनाच्या सुविधा असतात. रामलीला हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. उत्तर भारत, मध्यप्रदेशातील व्यावसायिक कलावंत रामलीला सादर करतात. हजारो भाविक रामलीलेचा आंनद घेतात. विजयादशमीला रावण दहन होते. या दिवशी नेत्रदिपक आतीषबाजी केली जाते. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा उत्सव प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे.

चंद्रकांत कारभारी (माहिती सहायक)

जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande