अमरावती : यमराजाद्वारे वाहतूक नियमांची जनजागृती
ग्रामीण पोलिसांचा अभिनव उपक्रम अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) :वाहतूक नियमांचे पालन न करणा-यांना त्य
अमरावती : यमराजाद्वारे वाहतूक नियमांची जनजागृती


ग्रामीण पोलिसांचा अभिनव उपक्रम

अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) :वाहतूक नियमांचे पालन न करणा-यांना त्यातील धोका जाणवून देणे व प्रभावी जनजागृतीसाठी अमरावती ग्रामीण पोलीसांनी अनोखा उपक्रम राबवला. त्यात यमराजाच्या वेशभूषेतील कलावंत वर्दळीच्या रस्त्यांवर उपस्थित राहून वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यात आले.हा उपक्रम लक्षवेधी ठरला.

दरम्यान, वाहतूक नियमांची पायमल्ली करणा-यांविरुद्ध जिल्हा ग्रामीण पोलीसांनी राबविलेल्या मोहिमेत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 12 हजार 128 प्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यानुसार वेगमर्यादेचे पालन न करणारे, तसेच वाहतूक नियमांची पायमल्ली करणा-यांविरुद्ध 2 कोटी 43 लक्ष 27 हजार 500 रूपये इतका दंड लावण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी दिली. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 तिवसा-अमरावती- लोणी, मोर्शी-वरूड-पांढुर्णा, मोर्शी-चांदूर बाजार- परतवाडा, दर्यापूर- खोलापूर- येवदा, आसेगाव- परतवाडा, दर्यापूर- अंजनगाव- परतवाडा, राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 नागपूर- औरंगाबाद, अमरावती- नांदगाव खंडेश्वर- यवतमाळ, परतवाडा-धारणी- खांडवा, अमरावती- चांदूर रेल्वे- धामणगाव- देवगाव या मार्गांवरून मोठी रहदारी होते. त्यातही मोर्शी- वरूड- पांढुर्णा, दर्यापूर- खोलापूर- येवदा, दर्यापूर-अंजनगाव- परतवाडा, मोर्शी- चांदूर बाजार- परतवाडा या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील हे अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा न पाळणा-या नागरिकांवर कारवाईसाठी जिल्हा वाहतूक शाखेने इंटरसेप्टर वाहनासह पथके तैनात केली आहेत, असे श्री. बारगळ यांनी सांगितले.

त्याचबरोबर, बहुरूपी कलावंताची मदत घेऊन जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यात यमराजाच्या वेशभूषेतील कलावंत महत्वाचे रस्ते, वर्दळीचे चौक, बाजारपेठा, शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट व सीटबेल्टच्या वापराबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. ग्रामीण पोलीसांच्या या विशेष मोहिमेत पोलीस अधिक्षक, तसेच अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, पोलीस अंमलदार दिलीप नांदूरकर, नीलेश तायडे, नीलेश राऊत, सुजीत वानखडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande