ऑक्टोबर महिन्यात कोळसा उत्पादनात 18% वाढ, पोहोचले 448 दशलक्ष टन
मार्च 2023 पर्यंत देशातील उर्जा प्रकल्पांकडील कोळशाचा साठा
Coal production


मार्च 2023 पर्यंत देशातील उर्जा प्रकल्पांकडील कोळशाचा साठा 45 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात देशातील एकूण कोळसा उत्पादनाने 448 दशलक्ष टनांचा टप्पा गाठला असून गेल्या वर्षी याच काळातील कोळसा उत्पादनाच्या तुलनेत यावर्षीच्या उत्पादनात 18%ची वाढ झाली आहे. सीआयएल अर्थात भारतीय कोळसा उत्पादन कंपनीच्या कोळसा उत्पादनात देखील 17%हून अधिक वाढ झाल्याचे दिसते.देशातील कोळशावर आधारित उर्जा प्रकल्पांच्या ठिकाणी नोव्हेंबर 2022 पर्यंत 30 दशलक्ष टन कोळसा साठवणुकीचे नियोजन केंद्रीय कोळसा मंत्रालयाने केले आहे. या नियोजनानुसार सातत्याने प्रयत्न सुरु ठेवून 31 मार्च 2023 पर्यंत देशातील औष्णिक उर्जा प्रकल्पांमध्ये असलेला कोळसा साठा 45 दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट मंत्रालयाने निश्चित केले आहे.

या वर्षीच्या पहिल्या सात महिन्यांत कोळसा वाहतुकीसाठी दर दिवशी उपलब्ध झालेल्या गाड्यांच्या संख्येत 9% वाढ झाल्यामुळे उर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा वाहून नेण्यासाठी मदत झाली आहे. रेल्वे आणि रस्ते प्रकारची वाहतूक उपलब्ध करून देऊन केंद्रीय उर्जा मंत्रालय देखील कोळशाची वाहतूक वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

समुद्र मार्गाने कोळशाच्या वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारमधील बंदरे, नौवहन आणि जलमार्ग, उर्जा, रेल्वे तसेच कोळसा ही सर्व मंत्रालये एकत्रितपणे काम करत आहेत. देशाच्या पूर्व भागात असलेल्या खाणींमधील कोळसा पश्चिमी किनाऱ्यावरील आणि उत्तर भागातील उर्जा प्रकल्पांना पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार या वाहतुकीला प्रोत्साहन देत आहे.

कोळशाचे देशांतर्गत उत्पादन, वाहतूक आणि कोळशाचा दर्जा यांच्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्रीय कोळसा मंत्रालय विशेषत्वाने लक्ष ठेवून आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande