महाराष्ट्रद्रोह्यांना इंगा दाखवूया - उद्धव ठाकरे
मुंबई, २४ नोव्हेंबर (हिं.स.) : भाजप महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहेत का, महाराष्ट्राला
Uddhav Thackeray


मुंबई, २४ नोव्हेंबर (हिं.स.) : भाजप महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहेत का, महाराष्ट्राला कंगाल करणे हा पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? राज्यपालांना हटवा अन्यथा आम्ही विरोध करू, आम्ही तीन-चार दिवस वाट पाहतो. आत्ताच वेळ आहे सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रद्रोह्यांना इंगा दाखवूया, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या विरोधात माझे महाराष्ट्रप्रेमींना आवाहन आहे, एकत्र या आणि एकत्र या, विरोधात आवाज उठवू या! केंद्राला जाग येणे गरजेचे, महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा नाही, हे पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे. शांततेच्या मार्गाने विरोध करुयात.

बोम्मई वरिष्ठांच्या मर्जीशिवाय बोलले का?

ठाकरे म्हणाले की, सांगलीच्या जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोट, सोलापूरवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरिष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू शकत नाही का? याचाच अर्थ बोम्मई जे काय बोलले हे वरिष्ठांच्या मर्जीशिवाय बोलले का? म्हणजेच भाजपचा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राचे उद्योग इतरत्र नेऊन महाराष्ट्र कंगाल करण्याचे सुरु आहे. हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का?, अशा प्रश्नांची सरबत्ती ठाकरे यांनी यावेळी केली. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्रद्रोह्यांना दाखवला पाहिजे. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचाय किंवा मोर्चा काढायचा. यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन ठाकरे यांनी सर्वपक्षीयांना केले आहे.

ज्यांना वृध्दाश्रमात सुध्दा कुणी घेणार नाही अश्यांची राज्यपालपदी नियुक्ती

सध्याची परिस्थिती कुणी यावे आणि टपली मारून जावे अशी आहे. एकीकडे देशाचे कायदामंत्री न्यायधीशांच्या नियुक्तीत अपारदर्शकता असल्याचे जाहीर विधान करून न्याय व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण करत आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय निवडणुक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुनावणी घेतं आहे. मी त्यापुढे जाऊन वेगळा पण महत्वाचा विषय मांडतोय. राज्यपालांची नियुक्ती ही साधारणपणे केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असत त्या विचारसरणीच्या व्यक्तींच्या केल्या जातात. मला वाटतय की याबाबत सुध्दा काही निकष ठरवण्याची वेळ आली आहे. कुणी गैरसमज करू नये, पण ज्यांना वृध्दाश्रमात सुध्दा कुणी घेणार नाही अश्यांची राज्यपालपदी नियुक्ती होते आहे. सडक्या मेंदूच्या मागे नक्की कुठला मेंदू याचा शोध घ्यावा लागेल. मी राज्यपाल पदाचा आदर करतो, परंतु कोश्यारींचा नाही. या अगोदर सावित्रीबाई, महात्मा फुलेंबाबत आपत्तीजनक विधान. त्यानंतर मुंबई, ठाणेकरांच्या बाबतीत तोच प्रकार आणि आता आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना, अपमान कोश्यारींनी केला आहे. मुख्यमंत्री लाचार असल्यामुळे दिल्लीश्वरांच्या कृपेमुळे मुख्यमंत्रीपदी त्यांच्यात राज्यपालांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही. मुख्यमंत्री म्हणजे पैचान कौन अशी अवस्था.

...तर आपण छत्रपतींचे नाव घ्यायला नालायक आहोत

पक्षीय राजकारणात जर आपली अस्मिता चिरडली जात असेल, तर आपण काहीच करू शकत नसेल, तर आपण छत्रपतींचे नाव घ्यायला नालायक आहोत. केंद्राने चाळे बंद करावे. राज्यपाल आम्हाला नको, त्या्ंना घरी पाठवा अथवा वृद्धाश्रमात पाठवा आमच्याकडे ते नको अन्यथा आम्हाला काही तरी करावे लागेल.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande