बोईसर, ५ डिसेंबर (हिं.स.) : येथील एका ५ वर्षीय चिमुकलीवर २१ वर्षीय शाहनवाज मिराज शहा या तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर पूर्वेत ही घटना घडली आहे. ५ वर्षीय चिमुकली घराबाहेर खेळत होती. त्यावेळी शाहनवाजने तिला खाऊ देणार, असे सांगत स्वत:कडे बोलावून घेतले. त्यानंतर तो तिला आपल्या घरात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेने चिमुकली फार भयभीत झाली होती. त्यानंतर शाहनवाजने तिने घरी कोणाला काही सांगू नये म्हणून तिला धमकी देखील दिली. घरी किंवा इतर कोणालाही काही सांगितल्यास मी तुझा जीव घेईल, असे तो म्हणाला. यामुळे चिमुकली फार घाबरली. मात्र घरी गेल्यावर तिने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी लगेच पोलिसांत तक्रार केली.
पीडित मुलगी सदर घटनेची माहिती तिच्या घरी सांगेल, त्यामुळे आपण अडचणीत येऊ, अशी भीती त्याला वाटली. त्यामुळे आरोपी बोईसरमधून पळून उत्तर प्रदेशमध्ये जाण्याच्या तयारीत होता. मात्र तक्रार दाखल केल्यावर लगेचच पोलिसांनी त्याचा शोध घेत काही तासांतच त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात त्याच्यावर ३७६ आणि ५०६ अंतर्गत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच पोक्सोसह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हिंदुस्थान समाचार