पदवीधर मतदार संघासाठी ९ डिसेंबरपर्यंत करता येणार मतदार नोंदणी
यवतमाळ, 06 डिसेंबर, (हिं.स.) : पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२३ साठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा
पदवीधर मतदार संघासाठी ९ डिसेंबरपर्यंत करता येणार मतदार नोंदणी


यवतमाळ, 06 डिसेंबर, (हिं.स.) : पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२३ साठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सुरू असून ९ डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. यासाठी पात्र पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी 23 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच 23 नोव्हेंबर पासून पुन्हा पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असून दावे व हरकती स्वीकारण्यात येत आहेत.

पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या प्रत्येक वेळी निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्याने पात्र पदवीधर व्यक्तीने नमुना १८ मध्ये नवीन अर्ज सादर करावेत. मतदार नोंदणीसाठी प्रथमच नमुना १८ मध्ये आधार क्रमांकासाठी रकाना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तथापि आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांना ऐच्छिक आहे.

भारताची नागरिक असलेली, पदवीधर मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी असलेली आणि पदवी मिळवून तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केलेली पदवीधर व्यक्ती मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज तहसील कार्यालयांमध्ये तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता दर्शविणारा पुरावा, कागदपत्रे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी यांच्याकडून प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. एकत्रित स्वरूपातील अर्ज प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे स्वीकारण्यात येणार नाहीत. मात्र, संस्थाप्रमुख त्यांच्या संस्थेतील पात्र पदवीधर कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रितरित्या सादर करू शकतात.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande