नवी दिल्ली, 6 डिसेंबर (हिं.स) : लाल फितीऐवजी लाल गालिचा घालणारा कारभार असावा या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला साकार करण्यासाठी राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली (एनएसडब्लूएस) सहाय्य करेल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.ते नवी दिल्लीत राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीबाबत आढावा बैठकीनंतर बोलत होते.
या बैठकीत 32 केंद्रीय मंत्रालये / विभाग, 36 राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि उद्योग संघटना (सीआयआय, फिक्की, असोचेम आणि पीएचडिक्की) यांचा सहभाग होता. या बैठकीत, विशेषत: महत्वाच्या माहितीच्या एकाच वेळी नोंदीद्वारे माहिती संकलनाचर एकत्रीकरण यांसारख्या अनेक नवीन कल्पना विविध हितसंबंधीतांकडून मांडण्यात आल्या, असे मंत्र्यांनी सांगितले.
आजपर्यंत राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीची गोयल यांनी प्रशंसा केली. सध्या सुरू असलेल्या बीटा चाचणी टप्प्यावर मोठ्या संख्येने भागधारकांनी राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीचे लाभ घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीकडे जवळपास 76000 अर्ज/विनंत्या प्राप्त झाल्या होत्या आणि राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 48000 मंजूरी देण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीवर 27 केंद्रीय विभाग आणि 19 राज्ये समाविष्ट करण्यात आली आहेत, असे गोयल यांनी सांगितले. राष्ट्रीय भू बँक देखील राष्ट्रीय एक खिडकी प्रणालीमध्ये एकीकृत करण्यात आली आहे.या पोर्टलच्या माध्यमातून औद्योगिक जमीन खरेदी एका छताखाली करता येईल असे ते म्हणाले. परवान्यांचे नूतनीकरण देखील राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली अंतर्गत आणले जाणार असून त्याची सुरुवात वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग या 5 मंत्रालयांपासून होणार आहे, अशी माहिती गोयल यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार