कणकवलीत राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात
सिंधुदुर्ग, 22 जून (हिं.स.) : जिल्ह्यातील पहिली बॉक्सिंग स्पर्धा आज पासून सुरु झाली आहे. या स्पर्धे
राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या लढतीची सुरुवात करताना उपस्थित मान्यवर. 


सिंधुदुर्ग, 22 जून (हिं.स.) : जिल्ह्यातील पहिली बॉक्सिंग स्पर्धा आज पासून सुरु झाली आहे. या स्पर्धेत पहिल्या दिवशी महिला बॉक्सरचा थरारा पाहायला मिळाला आहे. ऑलिम्पिंकमधील बॉक्सिंग हा एक महत्त्वाचा खेळ आहे. त्यामुळे खेळाडूंनी या खेळातील नैपुण्य शिकून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या स्पर्धांमध्ये सहभागी होत मेडल जिंकून या खेळात भारताचा दबदबा निर्माण करावा. तसेच कोकणातून बॉक्सिंग खेळाडू तयार व्हावे याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुद्ध असोसिएशनने जिल्ह्यात प्रथमच ८० वी पुरुष व १८ वी महिला राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद २०२२ स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, असे प्रतिपादन माजी सभापती मनोज रावराणे यांनी केले.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना मान्य सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुद्ध असोसिएशनतर्फे येथील चौंडेश्वरी सांस्कृतिक भवानात २२ ते २८ जून या कालावधीत ८० वी पुरुष व १८ वी महिला राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत डॉ. राजाराम दळवी यांनी केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागाच्या अधिकारी सौ. विद्या शिरस, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुद्ध असोसिएशनचे अध्यक्ष अभिमन्यू रासम, उपाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव डॉ. राजाराम दळवी, खजिनदार कृष्णा मातेफोडे, भोगवती साखर कारखान्याचे संचालक दत्ता भिडशिंगे, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष रणजित सावरकर, सचिव राकेश तिवारी, खजिनदार एकनाथ चव्हाण, उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, तांत्रिक अधिकारी राजन जोथाडी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विधान परिषद कोकण शिक्षक मतदार संघ आमदार बाळाराम पाटील यांनी देखील भेट दिली. अशा पद्धतीच्या बॉक्सिंग चॅम्पियनशिप घ्याव्यात, जेणेकरून नवीन बॉक्सर घडतील व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन होईल असे सांगत या स्पर्धेच्या पुढील वाटचालीसाठी आमदार पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी देखील या बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला भेट दिली व स्पर्धकांचे मनोबल वाढवत आयोजकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॉक्सर घडवण्यासाठी आपण प्रयत्न करा आम्ही तुमच्या सोबत असल्याचे देखील सांगितले.

क्रीडाअधिकारी विद्या शिरस म्हणाल्या की, सिंधुदुर्गात प्रथमच बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्याचा सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुद्ध असोसिएसनचा उपक्रम स्तुत्य आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यात बॉक्सिंगपटू तयार होतील. सिंधुदुर्गातून विविध खेळांतील खेळाडू तयार व्हावेत याकरिता क्रीडा विभाग नेहमीच प्रयत्नशील आहे. खेळाडूंनी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही क्रीडा विभागाची जबाबदारी आहे. त्यातूनच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी दत्ता भिडशिंगे, राकेश तिवारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्ठीयुद्ध असोसिएशनचे सदस्य व क्रीडा रसिक उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande