आमदार संजय शिरसाटांचे मुख्यमंत्र्यांना अनावृत्त पत्र
ठाकरेंच्या फेसबुक-लाईव्हला पत्रातून दिले उत्तर गुवाहटी, 23 जून (हिं.स.) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरें
संजय शिरसाट


ठाकरेंच्या फेसबुक-लाईव्हला पत्रातून दिले उत्तर

गुवाहटी, 23 जून (हिं.स.) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमदारांना केलेल्या आवाहनाला औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी अनावृत पत्राच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. खरमरीत सदराज मोडणारे हे पत्र स्वतः एकनाथ शिंदे यांनी जारी केलेय. या पत्रातून शिवसेनेच्या आमदारांची व्यथा मांडण्यात आलीय.

या पत्रात शिरसाट म्हणाले की, तुम्ही वर्षा बंगला सोडताना झालेली गर्दी पाहून समाधान वाटले. गेली अडीच वर्षे ही दारे शिवसेनेच्या आमदारांसाठी बंद होती. जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना डावलून तुमच्या भोवती जमलेल्या तथाकथित चाणक्यांचे ऐकले जात होते. ते बडवे आम्हाला डावलून निवडणुकांची व्यूहरचना आखायचे. तुम्ही कधी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर गेलाच नाहीत. त्यामुळे वर्षा निवासस्थानी येऊन भेटण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला प्रवेश नसायचा. अनेक तास वाट पाहूनही तुमच्या भोवतीचे बडवे आम्हाला भेट नाकारत होते. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुमची सहज भेट घेत असत. त्या भेटीचे सोशल मिडीयावर फोटो देखील टाकायचे. आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का? हा आमचा सवाल आहे. यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची दारे आमच्यासाठी उघडी होती. मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घ्यायला लावला असा प्रश्न शिरसाटांनी विचारलाय.

हिंदुत्व, अयोध्या राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना ? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखले ? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही ? असा सवालही शिरसाट यांनी पत्राद्वारे उपस्थित केलाय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande