ठाणे, 23 जून (हिं.स.) आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीनुसार निवड झालेल्या बालकांना २८ जून २०२२ पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी दिली.
वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ. 1 ली ते 8वी पर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते . या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत सन २०२२-२३ ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात आर.टी.ई. २५ % प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीमधील टप्पा क्र.२ मध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण ७१० अर्जांची निवड झाली आहे.
प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका /महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा ,तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एस. एम. एस प्राप्त झाले असतील, परंतु फक्त एस. एम. एस वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी. प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका / मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
हिंदुस्थान समाचार