राजीव चंद्रशेखर यांनी घेतली बोरिस जॉन्सन यांची भेट
लंडन, 3 जुलै (हिं.स) :केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर या
राजीव चंद्रशेखर 


लंडन, 3 जुलै (हिं.स) :केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भारतीय स्टार्ट-अप्स, युनिकॉर्न उद्योग यांचे प्रमुख आणि संशोधकांचा समावेश असलेल्या प्रतिनिधी मंडळासोबत यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली.अभिनव संशोधन तसेच तंत्रज्ञान या क्षेत्रांत, भारत आणि युके या देशांमध्ये भविष्यातील सहकारी संबंध तसेच भागीदारी याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

याच संदर्भात केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांनी ब्रिटीश खासदार पॉल स्कली यांची देखील भेट घेतली. या भेटीविषयी माहिती देताना चंद्रशेखर म्हणाले की, भारत आणि युके या दोन्ही देशांना संशोधनावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करायचा आहे. “एकूण अर्थव्यवस्थेच्या 25 टक्के अर्थव्यवस्था डिजिटल असावी असा आमचा प्रयत्न आहे. यूके सरकारचे देखील हेच उद्दिष्ट आहे,” ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांनी इंडिया ग्लोबल मंचावर, युकेच्या गृहसचिव प्रीती पटेल, युकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सचिव तसेच सरकारी व्यापार मंडळाच्या अध्यक्ष अॅनी मारी ट्रेव्हेल्यन आणि युकेचे तंत्रज्ञान तसेच डिजिटल अर्थव्यवस्था मंत्री ख्रिस फिलीप यांच्यासह मंत्रीस्तरीय गोलमेज परिसंवादात देखील भाग घेतला.

तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, 1990 च्या सुमाराला भारताला त्याच्या सर्व तंत्रज्ञानविषयक गरजांवर विसंबून राहावे लागत होते आणि कोणत्याही गोष्टीच्या उत्पादनासाठी लागणारे सर्व सुटे भाग तसेच साधने आयात करावी लागत होती. आज हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. “आता भारत 5 जी संरचनेचे काम करत आहे आणि 5जी उत्पादनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी साधने देखील देशातच निर्मिली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल भारत संकल्पनेअंतर्गत हे यश मिळाले आहे,” ते पुढे म्हणाले.

केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांनी युकेच्या आयजीएफमध्ये डिजिटल युगाचे भविष्य या विषयावरील चर्चासत्रात देखील भाग घेतला आणि सध्या सर्वत्र वेगाने होत असलेले डिजिटलीकरण तसेच वापरकर्त्याच्या हानीविरुध्द डिजिटल नागरिकांचे संरक्षण करण्याची गरज याविषयी त्यांची मते मांडली. सायबरस्पेस हा सीमाविरहित डोमेन असल्यामुळे डिजिटल प्रणालीच्या वापरकर्त्यांची सुरक्षा तसेच विश्वास यांच्या सुनिश्चितीसाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी विविध देशांदरम्यान, विशेषतः समान विचारसरणीच्या लोकशाही देशांदरम्यान सहकारी संबंध प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande