भारत आणि युरोपीय महासंघातील वाटाघाटींची पहिली फेरी पूर्ण
नवी दिल्ली, 3 जुलै (हिं.स) :भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील भौगोलिक मानांकनासह व्यापार तसेच गु
 वाटाघाटींची पहिली फेरी


नवी दिल्ली, 3 जुलै (हिं.स) :भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील भौगोलिक मानांकनासह व्यापार तसेच गुंतवणूकविषयक करारांच्या संदर्भातील दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये सुरु असलेल्या वाटाघाटींची पहिली फेरी नवी दिल्ली येथे पूर्ण झाली. भारतातर्फे मुक्त व्यापार करारांवरील वाटाघाटींचे नेतृत्व मुख्य वाटाघाटीकार आणि वाणिज्य विभागाच्या संयुक्त सचिव निधी मणी त्रिपाठी यांनी केले तर युरोपीय महासंघाच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व मुख्य वाटाघाटीकार ख्रिस्तोफे किनेर यांनी केले.

आठवडाभर सुरु असलेल्या या वाटाघाटी मिश्र पद्धतीने झाल्या- काही बैठका नवी दिल्ली येथे पार पडल्या आणि बहुतांश अधिकारी आभासी प्रणालीद्वारे मिश्र पद्धतीने या बैठकांमध्ये सहभागी झाले. चर्चेच्या या फेरीदरम्यान मुक्त व्यापार करारातील 18 धोरणविषयक मुद्द्यांवर 52 तांत्रिक सत्रे झाली तर गुंतवणूक संरक्षण आणि भौगोलिक मानांकन या विषयांवर 7 सत्रे घेण्यात आली. या वाटाघाटींसाठी चर्चेची दुसरी फेरी ब्रसेल्स येथे सप्टेंबर 2022 मध्ये होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि युरोपीय आयोगाचे कार्यकारी उपाध्यक्ष वाल्डीस डोम्ब्रोव्ह्स्कीस यांच्या दरम्यान गेल्या महिन्यात ब्रसेल्स येथे या वाटाघाटींची सुरुवात झाली होती.

वर्ष 2021-22 मध्ये भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात 116.36 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार होत होता. जागतिक समस्या असून देखील वर्ष 2021-22 मध्ये द्विपक्षीय व्यापाराने 43.5% इतका भरीव वार्षिक विकासदर गाठण्यात यश मिळविले होते. सद्यस्थितीला, युरोपीय महासंघ हा अमेरिकेनंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि भारतीय निर्यातीसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. युरोपीय महासंघासोबत केलेल्या व्यापारविषयक करारांमुळे भारताला, मूल्य साखळीचे संरक्षण करण्याबरोबरच त्याच्या वस्तू आणि सेवांची निर्यात अधिक विस्तारित तसेच वैविध्यपूर्ण पद्धतीने करण्यात मदत होईल. या वाटाघाटींमध्ये सहभागी असलेले दोन्ही देश व्यापारविषयक वाटाघाटी अधिक विस्तारित पायावर, समतोल आणि व्यापक असाव्या तसेच त्या निष्पक्षता तसेच परस्पर सहकार्याच्या तत्वावर आधारलेल्या असाव्या या दृष्टीने प्रयत्नशील आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande