उदयपूर, अमरावतीनंतर नागपुरातही तोच प्रकार
जीवाच्या भीतीने एक कुटुंब झाले परांगदा - पोलिसात गुन्हा दाखल, कारवाई नाही नागपूर, 04 जुलै (हिं.स.
संग्रहित


जीवाच्या भीतीने एक कुटुंब झाले परांगदा

- पोलिसात गुन्हा दाखल, कारवाई नाही

नागपूर, 04 जुलै (हिं.स.) : नुपूर शर्माच्या समर्थनात सोशल मिडीयावर पोस्ट केल्यामुळे उदयपूर येथे कन्हैयालाल आणि अमरावतीत उमेश कोल्हेंची हत्या झाल्यानंतर नागपुरातही तसाच प्रकार पुढे आलाय. नागपुरातील एका कुटुंबाला मिळणाऱ्या धमक्यांमुळे राज्य सोडून पळावे लागले आहे. याप्रकरणी स्थानिक नंदनवन पोलिसात तक्रार दाखल केली असून अजूनपर्यंत पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही.

यासंदर्भात पिडीत कुटुंबातील एका सदस्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाने 14 जून 2022 रोजी इंस्टाग्रामवर नुपूर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट टाकली होती. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजेपासून त्याला सतत धमकीचे फोन आणि मेसेज येऊ लागले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने पहाटे 4 वजाता नंदनवन पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. घटनेच्या दोन दिवसांनी सुमारे 100 जणांचा जमाव त्याच्या घरावर चाल करून आला. परंतु, त्यांना यापूर्वीच घटनेची चाहूल लागल्यामुळे पिडीत तरुण आणि त्याचे कुटुंब परिसरातील एका हॉटेलमध्ये जाऊन लपले होते. या हॉटेलमध्ये दोन दिवस वास्तव्य केल्यानंतर त्यांनी नागपूर सोडले. त्यानंतर आपल्या एका नातेवाईकाकडे काही दिवस मुक्काम केला. परंतु, त्यांच्या मागचा धमक्यांचा ससेमीरा न थांबल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सोडून अज्ञात ठिकाणी प्रस्थान केले.

नुपूरच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्या तरुणाचा मोठा भाऊ व्यवसायाच्या संदर्भात नागपूरला आला असून त्यालाही लपत-छपत वावरावे लागत आहे. यासंदर्भात बोलताना तो म्हणाला की, कुठल्याही धर्माचा अपमान करणे हा आमचा हेतून नव्हता. माझा लहान भाऊ तरुण असून त्याने चुकून पोस्ट फॉर्वड केली होती. यासंदर्भात आमच्या कुटुंबाने त्याला ती पोस्ट डिलीट करायला लावली. तसेच दुसरी पोस्ट अपलोड करून क्षमायाचना करायला लावले. परंतु, त्यानंतही आम्हाला धमक्यां दिल्या जात आहेत. उदयपूर आणि अमरावतीच्या घटनांमुळे आमचे संपूर्ण कुटुंब घाबरलेले असून अज्ञात स्थळी लपून बसले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अपेक्षित करावई होत नसल्याचा आरोपही पिडीत तरुणाच्या भावाने केला.

याप्रकरणी नंदनवन पोलिसांशी संपर्क साधला असता पिडीत तरुणाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, हे प्रकरण आणि तपास याबाबत बोलण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे पोलिस नेमके काय करीत आहेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande