माता सरस्वती आणि छगन भुजबळ
सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. शक्तीची आणि विद्येची देवता म्हणून माता शारदा देवीचा हा उत्सव शारदा उत्
माता सरस्वती


सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. शक्तीची आणि विद्येची देवता म्हणून माता शारदा देवीचा हा उत्सव शारदा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो. शारदा देवीला सरस्वती माता असे सुद्धा संबोधले जाते.

वंदे सरस्वती देवीं,

मयुरासनमण्डिताम् ।

वीणावादननादेन,

रमयन्तीं जगत् त्रयम् ।।

मयुरासनावर विराजमान झालेल्या आणि जिच्या वीणावादनाच्या नादाने तिन्ही लोकांची चेतना जागवत शाश्वत आनंदित करणाऱ्या सरस्वती देवीला वंदन असो.

अशा उत्कट भावनेने सरस्वतीमातेचे गुणगान गाऊन तिला वंदन केले आहे.

अशा वंदनीय मातेचा अपमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. ते आपल्या भाषणात म्हणाले,

सरस्वतीला आम्ही पाहिले नाही. सरस्वतीने केवळ तीन टक्के लोकांना ज्ञान दिले. तिचा फोटो शाळेत का लावायचा?

सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे देव आहेत. त्यांचे फोटो शाळेत लावले पाहिजेत.

छगन भुजबळांनी सरस्वती माते बद्दल जे उद्गार काढले त्याबद्दलच आक्षेप आहे. सरस्वती देवीला पाहिले नाही मग तिचा फोटो का लावायचा? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या छगन भुजबळांना एक सामान्य प्रश्न विचारायचा आहे. हा प्रश्न विचारण्या मागचा हेतू असा की त्यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या विधानाचा अर्थ ज्यांना आपण पाहिले नाही त्यांचा फोटो लावायची आवश्यकता नाही, असा होतो. त्याला अनुसरून प्रश्न आहे.

सावित्रीबाई फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या आणि अशा कोणत्याही जातीत जन्माला आलेल्या महनीय व्यक्तींविषयी विषयी आम्हाला नितांत आदर आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. भेदभाव करून विधान करताना बुद्धी कशी भ्रष्ट होते ते सांगण्याचा आमचा हेतू आहे.

सरस्वती मातेला पाहिले नाही म्हणून तिचा फोटो लावायची आवश्यकता नाही. असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ या दिवशी झाला. सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला तो दिवस १० मार्च १८९७.

छगन भुजबळ यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९४७ या दिवशी झाला. म्हणजे सावित्रीबाई फुले यांचे निधन झाल्यानंतर पन्नास वर्षांनी छगन भुजबळ यांचा जन्म झाला आहे. त्यावरून आपण असे निश्चित अनुमान काढू शकतो की जगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांना प्रत्यक्ष पाहिले नाही. किंबहुना १८९७ नंतर जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीने सावित्रीबाई फुले यांना पाहणे शक्य नाही. तरीसुद्धा सावित्रीबाई फुले यांचा फोटो शाळेत लावला तर चालतो असे ते म्हणतात.

सरस्वती देवीला पाहिले नाही तसे त्यांनी सावित्रीबाई फुले यांनाही पाहिले नाही. पण सावित्रीबाई फुले यांचा फोटो शाळेत लावला तर चालणार आहे. पण सरस्वती देवीचा फोटो लावायचा नाही. छगन भुजबळ यांची ही दोन्ही विधाने परस्पर विरोधी आहेत. त्यांची हीच विधाने त्यांचा वैचारिक आणि बौद्धिक गोंधळ झाला असल्याचे सिद्ध करतात.

सरस्वती देवीची उपासना केल्या वाचून कोणीही महान होत नाही. आपल्या संस्कृतीने सदाचरणी, सद्गुणी,ज्ञानी लोकांना, समाजकार्य, राष्ट्रकार्य निरलस, निरपेक्ष भावनेने करणाऱ्या महनीय व्यक्तींना देवस्थानी, पूज्यस्थानी मानले आहे. त्या व्यक्तींमध्ये सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा समावेश होतो. त्यांच्याविषयी आम्हाला कोणताही आक्षेप नाही.

छगन भुजबळ यांच्या मनात ब्राह्मण समाजाविषयी द्वेष आहे हे लपून राहिले नाही. तो ते वेळोवेळी व्यक्त करतातच. पण त्यांनी ब्राह्मण समाजाचा राग सरस्वती देवीवर काढू नये. सरस्वती देवीचा अपमान करू नये. एवढा सारासार विवेक छगन भुजबळ यांनी दाखवला असता तर त्यांची सद्सद्विवेकबुद्धी अल्प प्रमाणात का होईना जागी आहे असे म्हणता आले असते.

वास्तविक आपल्या घटनेने सर्वधर्मसमभाव स्वीकारला आहे. सर्व धर्म जेव्हा समान असतात तेव्हा सर्व जाती सुद्धा समान असतात हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. असे असताना जाती जातीत वैमनस्य निर्माण करून छगन भुजबळ देशातील सामाजिक वातावरण आणि सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशी शंका येते.

छगन भुजबळ यांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवून सरस्वती माते बरोबर ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे, समाजाला सुशिक्षित सुसंस्कृत करण्यासाठी ज्यांनी आपला आयुष्य निरलस निरपेक्ष भावनेने समर्पित केले त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव जतन करावा असे म्हटले असते तर त्यांची प्रतिमा अधिक उजळली असती आणि त्यांनी राजकीय पक्षाचा एक नेता म्हणून आपण कसे योग्य आहोत तेही सिद्ध केले असते. पण सरस्वती मातेची कृपादृष्टी त्यांना लाभली नाही. कारण ते सरस्वती देवीचे अस्तित्वच नाकारत आहेत. तिच्याविषयी त्यांच्या मनात कोणताही आदरभाव नाही म्हणून त्यांच्या वाणीतून अवाच्य उद्गार निघाले. याची अनुभूती सरस्वती मातेवर नितांत श्रद्धा आणि निष्ठा असलेल्या तिच्या भक्तांना झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- दुर्गेश जयवंत परुळकर

व्याख्याते आणि लेखक

९८३३१०६८१२

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande