मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे विस्तीर्ण जाळे
बृहन्मुंबई महानगरपालिका, आशिया खंडातील सर्वाधिक अर्थसंकल्प असलेली महापालिका. जिचा आकडा काही राज्यांच
water supply


बृहन्मुंबई महानगरपालिका, आशिया खंडातील सर्वाधिक अर्थसंकल्प असलेली महापालिका. जिचा आकडा काही राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही अधिक आहे. अशा देशाच्या आर्थिक राजधानीत दररोज हजारो नागरिक, परप्रांतीय ये-जा करत असतात. या सर्वांना आपल्यात सामावून घेणाऱ्या शहराला दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी २४*७ यंत्रणा कार्यरत असते. त्याकरता शेकडो किलोमीटरवरून पाणी वाहून आणण्याची क्षमता गेल्या काही दशकांत महापालिकेने निर्माण केली आहे. यात अद्ययावत यंत्रणेचा देखील अवलंब केला जातो.

हे पाणी कुठून, कसे आणि कोणकोणत्या प्रक्रियेतून मुंबईकरांना मिळते याची कदाचित त्यांना जाणीवही नसेल. याच यंत्रणेचे विलक्षण, विस्तीर्ण आणि देशातीलच नव्हे अन्य देशांच्या तुलनेत एकमेवाद्वितीय जाळे कसे आहे, याची आपण माहिती करून घेऊया.....

· मुंबई शहराला सध्या तानसा (४५५ द.ल.लि. प्रतिदिन), मोडक सागर (वैतरणा) (४५५ द.ल.लि. प्रतिदिन), हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा (४५५ द.ल.लि. प्रतिदिन), उर्ध्व वैतरणा (६४० द.ल.लि. प्रतिदिन) आणि भातसा (२०२० द.ल.लि. प्रतिदिन) या जलस्रोतातून पाणीपुरवठा करण्यात येतो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे १०० कि.मी. वा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहेत. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ दोन लहान स्रोत विहार (९० द.ल.लि. प्रतिदिन) आणि तुळशी (१८ द.ल.लि. प्रतिदिन) आहेत. मुंबई शहराला या सर्व जलस्त्रोतातून ३८५० द.ल.लि. प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

· शहर बाह्य मुख्य जलस्रोतांमधील पाणी जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत वाहून आणण्याचे काम २४०० मि.मी. ते ३००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे व ५५०० मि.मी. व्यासाच्या कॉंक्रिटच्या भूमीगत जलबोगद्याच्या सहाय्याने गुरुत्वाकर्षद्वारे होते. सुमारे ५० टक्के पाणीपुरवठा हा उदंचन व्यवस्था वापरून जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत आणला जातो.

· जलस्रोतांमधील पाणी शुध्दीकरणाकरीता पांजरापूर (१३६५ द.ल.लि. प्रतिदिन), भांडुप संकुल (२८१० द.ल.लि. प्रतिदिन) आणि विहार (९० द.ल.लि. प्रतिदिन) आणि तुळशी (१८ द.ल.लि. प्रतिदिन) येथे आणले जाते. या अशुद्ध पाणी वाहून आणणाऱ्या जलवाहिन्यांना प्राथमिक स्तर व्यवस्था म्हणतात, जी सुमारे ४०० कि.मी. एवढ्या लांबीची आहे. प्राथमिक स्तर व्यवस्थेमध्ये सुमारे ४३ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. जल शुध्दीकरण केंद्रामध्ये पाणी पोहोचविल्यानंतर त्यामध्ये प्रथम (पीएसी) पॉली एल्युमिनियम क्लोराईड मिसळले जाते. हे पीएसी मिश्रीत पाणी मोठ-मोठ्या टाक्यांमधून नेऊन त्यास संथ होण्यासाठी अवधी दिला जातो. यामुळे पीएसीची प्रक्रिया पूर्ण होऊन जड झालेला गाळ / धुलीकण या मोठाल्या टाक्यांच्या तळाशी बसतात. हा गाळ सतत टाक्यांमधून बाहेर काढला जात असतो. नंतर हे पाणी पूर्णतः गाळण्यासाठी रेतीचा / वाळूचा थर असलेल्या टाक्यांमधुन (रॅपिड सँड फिल्टर्स) मधून नेण्यात येते. पूर्णतः गाळलेले / शुध्द झालेले पाणी फिल्टर बेडच्या तळातून काढून घेऊन निर्जंतुकीकरणासाठी पुढे नेण्यात येते. शुध्द पाणी बऱ्याच लांबवर वाहून नेण्याचे असल्याने निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. निर्जंतुकीकरण केलेले पाणी एका महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिकठिकाणी असलेल्या सेवा जलाशयापर्यंत पोहोचविले जाते. योग्य शुध्दीकरण सुविधांमुळे WHO व IS - १०५०० ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसार जलशुद्धीकरण करणे साध्य झाले आहे. शुध्द पाण्याचा गढुळपणा पूर्ण वर्षभर ००.३ NTU वा त्यापेक्षा कमी असतो व रेसिड्युअल क्लोरीनचे ग्राहकाच्या ठिकाणचे प्रमाण ०.२ PPM एवढे असते.

· प्रक्रिया केलेले पाणी जलशुध्दीकरण केंद्राजवळील महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिकठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयापर्यंत पुढील वितरणासाठी विभागले जाते. यासाठी १२०० मि.मी. ते २४०० मि.मी. च्या पोलादी जलवाहिन्या व २२०० मि.मी. ते ३५०० मि.मी. व्यासाच्या भूमीगत जलबोगद्यांचा वापर केला जातो. या जलवाहिन्यांची लांबी सुमारे ४५० मि.मी. असून सुमारे २७ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. या जलवितरण जाळ्यास द्वितीय स्तर वहन व्यवस्था म्हणतात.

· सेवा जलाशयातून Feeder वाहिनी व Distribution वाहिनीच्या द्वारे पाणी विविध परिसरातील ग्राहकांपर्यंत सुमारे ३ लाख ६० हजार जलजोडण्यांद्वारे पोहचविले जाते. या संपूर्ण प्रणालीला तृतीय स्तर प्रणाली म्हणतात. यामध्ये २४०० मि.मी. ते १५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांचा समावेश आहे. तृतीय प्रणालीच्या जाळ्यांची अंदाजित लांबी सुमारे ५००० कि.मी. आहे त्यामध्ये सुमारे २५ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. मुंबईतील दररोजचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सुमारे १००० झडपांची उघडझाप केली जाते.

· पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता महानगरपालिकेतर्फ़े दरवर्षी अनेक कामे / उपाययोजना केल्या जातात. जसे की विकसनशील भागांमध्ये नविन जलवाहिन्या टाकणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या टप्प्या-टप्प्याने बदलून त्या ठिकाणी नविन जलवाहिनी टाकणे, सेवा जलजोडण्यांच्या जुडग्यांऐवजी एक सामाईक जलवाहिनी टाकणे, गळतीची ठिकाणे शोधून त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे.

· मुंबई शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी दररोज सुमारे ११५० अभियंते व ८९५० कामगार व इतर कर्मचारी वर्ग कार्यरत असतो.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande