फ़ेडेक्सच्या सर्वेक्षणानुसार एसएमई उद्योगांसाठी ई-कॉमर्समधील संधी वाढण्याची चिन्हे
मुंबई, ३० सप्टेंबर, (हिं.स) - फेडेक्स कॉर्प. (NYSE: FDX) हिची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप
फ़ेडेक्सच्या सर्वेक्षणानुसार एसएमई उद्योगांसाठी ई-कॉमर्समधील संधी वाढण्याची चिन्हे


मुंबई, ३० सप्टेंबर, (हिं.स) - फेडेक्स कॉर्प. (NYSE: FDX) हिची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या FedEx Express द्वारे सादर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, आधीच भरभराट होत असलेल्या ई-कॉमर्स क्षेत्रात आणखी वाढीसाठी जागा आहे, यावर लहान व मध्यम आकाराच्या दोन्ही कंपन्या (एसएमई) आणि ग्राहक सहमत आहेत, तसेच हा कल ई-कॉमर्स क्षेत्रातूनही दिसून येत आहे. सुमारे ८३ टक्के भारतीय ग्राहकांनी गेल्या तीन वर्षांत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे आणि हे प्रमाण यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.

‘ई-कॉमर्स सर्वेक्षणात पुढे काय’ असे शीर्षक असलेल्या या सर्वेक्षणामध्ये भारतातील लहान व मध्यम आकाराचे उद्योग (एसएमई) आणि ग्राहक, तसेच एशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिका क्षेत्र (एएमईए) या भागांतील १० इतर बाजारपेठा यांची मते आजमावण्यात आली. जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून या भागांतील ई-कॉमर्सची उत्क्रांती समजून घेणे आणि तिच्या भविष्यातील वाढीस चालना देणारे कल ओळखणे याबाबतचे संदर्भ गोळा करण्यात आले.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ग्राहक पर्सनलायझेशन, शॉपरटेन्मेंट आणि पेमेंट यांच्या पर्यायांमध्ये नावीन्यपूर्ण पर्याय शोधत असतात. त्यांना उत्कृष्ट अनुभव मिळवणे, नवीन ब्रँड शोधणे आणि खरेदी करणे हे सोयीस्कररित्या हवे असते. सध्याच्या सणासुदीच्या, उत्सवांच्या दिवसांत अनेक शॉपिंग फेस्टिव्हल्स उपलब्ध असल्याने, ग्राहक त्यांमध्ये जास्तीतजास्त सवलती कोठे मिळतील, याचा शोध घेत असतात. एकंदरीत या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की नवीन पद्धतींचा प्रयोग करण्यासाठी आणि ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी ई-टेलर्सना भरपूर वाव आहे.

“कोविडमुळे आपली सर्वांची जीवनशैली अशा एका टप्प्यावर आली आहे, जिथे ऑनलाइन खरेदी करण्यास प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व भूप्रदेशांमध्ये ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून आता या पद्धतीतून माघार घेणे कोणालाही शक्य होणार नाही. म्हणूनच, ई-कॉमर्स हे क्षेत्र या ग्राहकांच्या या वाढत्या क्रयशक्तीचा भार पेलण्यास सज्ज झाले आहे,” असे फेडेक्स एक्सप्रेस चे एशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिका (एएमईए) या विभागासाठीचे प्रेसिडेंट कंवल प्रीत यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, “अधिकाधिक लोक ऑनलाइन खरेदी करीत असल्याने ग्राहकांची प्राधान्येही अधिकाधिक आधुनिक होत चालली आहेत. एसएमई उद्योग आणि ई-मर्चंट हे आपापले ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म विकसित करत असताना, ग्राहकांना काय हवे आहे या विषयीच्या संधी आमच्या सर्वेक्षणातून त्यांच्यासाठी मांडल्या जात आहेत. ई-टेलर्स त्यांच्या ग्राहकांशी कसे गुंतून राहतात आणि आम्ही आमच्या शिपिंग सोल्यूशन्समध्ये कशाप्रकारे नवनवीन संशोधन करत आहोत, यांमागे ग्राहकांचा अनुभव ही एक प्रेरक शक्ती आहे. विशेषत: ई-कॉमर्स व्यवसायांसाठी विस्तारित स्वरुपाचा पोर्टफोलिओ विकसीत करून FedEx ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि ई-कॉमर्सची वाढ सुरू ठेवण्यासाठीच्या चांगल्या स्थितीत आहे.”

कोविड साथीच्या काळात संपूर्ण एएमईए प्रदेशांत ई-कॉमर्सची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आणि भारतही त्याला अपवाद नाही. बाजारपेठा अधिकाधिक प्रभावशाली होत असल्याने इतर एएमईए बाजारपेठांतील ग्राहकांपेक्षा भारतातील ग्राहकांमुळे ई-कॉमर्सच्या भवितव्याचा व वाढीचा अंदाज व्यवस्थित बांधता येईल. ई-कॉमर्सच्या माध्यमातून मोठा लाभ करून घेता येईल, अशी बहुसंख्य भारतीय एसएमई उद्योगांची धारणा बनली आहे.

“एसएमई क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढीचे इंजिन आहे. कोविड साथीच्या काळात ई-कॉमर्स क्षेत्रामुळेच अनेक एसएमईंना आपला व्यवसाय सुरू ठेवता आला आहे आणि तो विस्तारण्याची संधीही मिळाली. आज, भारतातील एसएमई उद्योगांसाठी परदेशांमध्ये व्यापार करण्याच्या अनेक संधी चालून आल्या आहेत आणि य उद्योगांना त्यातून प्रगती साधता येत आहे. या एसएमईना जगाशी जोडण्यास FedEx मदत करते. याकामी आमचे जागतिक नेटवर्क, खास तयार केलेली सोल्यूशन्स आणि मूल्यवर्धित सेवा त्यांना सहाय्य करतात आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास त्यांना सक्षम करतात,” असे FedEx चे मध्य पूर्व, भारतीय उपखंड व आफ्रिका कामकाज या क्षेत्राचे सिनीअर व्हाइस प्रेसिडेंट कामी विश्वनाथन यांनी सांगितले.

ई-कॉमर्स क्षेत्र परिपक्व; परंतु आणखी वाढीच्या दिशेने वाटचाल

एशिया पॅसिफिक प्रदेशात भारत, मेनलँड चायना, जपान आणि कोरिया यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स बाजारपेठांचा समावेश होतो. या प्रदेशातील ५७ टक्के लोकसंख्या ऑनलाइन पद्धतीने खरेदी करीत असल्याने ई-कॉमर्स विक्रीतून येथे मिळणारा महसूल २.०९ लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

एएमईएमधील एसएमई आणि ग्राहक हे दोघेही आपल्या ई-कॉमर्सच्या वापराबाबत परिपक्व होत आहेत आणि कोविडमुळे ई-कॉमर्सला जी चालना मिळाली, ती यापुढेही कायम राहणार आहे, याबाबत हे दोन्ही गट सहमत आहेत. दहापैकी आठ एसएमईंना विश्वास आहे की पुढील तीन वर्षांत त्यांच्या व्यवसायात ई-कॉमर्सला अधिक महत्त्व प्राप्त होईल आणि दहापैकी नऊ जणांना वाटते की ते या आव्हानासाठी सुसज्ज आहेत. ८० टक्के ग्राहकांनी नोंदवले आहे की ई-कॉमर्सने गेल्या तीन वर्षात त्यांच्या एकूण खरेदीत मोठा वाटा उचलला आहे, तर ७१ टक्के ग्राहकांच्या मते यात आणखी वाढ होणार आहे.

पुढील तीन वर्षांत आपल्या देशांत ई-कॉमर्स क्षेत्र वाढेल, याविषयी भारत, मलेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम येथील एसएमई उद्योग सर्वाधिक आशावादी आहेत. या बाजारपेठेतील ग्राहकांनीही हीच भावना व्यक्त केली. या प्रत्येक बाजारपेठांमध्ये ई-कॉमर्सचे प्रमाण एकूण किरकोळ विक्रीच्या ६ टक्क्यांपेक्षा सध्या कमी आहे.

कोविडमुळे ग्राहकांच्या खरेदीची वर्तणूक मूलभूतपणे बदलली आहे, असे भारतातील ८० टक्के एसएमई उद्योगांचे मत आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांचा अंदाज असा आहे की ई-कॉमर्स सतत तेजीत राहील आणि पुढील तीन वर्षांत तो त्यांच्या व्यवसायाच्या वाढीचा अविभाज्य भाग असेल. ९३ टक्के एसएमई यामुळे उत्साहित आहेत आणि त्यांना विश्वास आहे की या वाढीचा फायदा घेण्यासाठी ते योग्य स्थितीत आहेत.

सध्या आणि भविष्यातही ई-कॉमर्सच्या एकूण संदर्भात बाजारपेठांच्या महत्त्वाबाबत भारतीय एसएमई आणि ग्राहक हे दोघेही सहमत आहेत. खरेतर, दोन तृतीयांश भारतीय ग्राहक अजूनही केवळ बाजारातून प्रत्यक्ष रुपात वस्तू खरेदी करतात. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष बाजारपेठेचे हे महत्त्व स्पष्ट असतानाही सध्या ५८ टक्के एसएमई उद्योग त्यांच्या स्वतःच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना थेट विक्री करतात, हेही लक्षात घेतले पाहिजे.

सेवांबाबतच्या अनुभवांविषयी अपेक्षाभंग

मागणीनुसार अर्थव्यवस्थेत अधिकाधिक ग्राहक सहभागी होत असल्याने आणि शिपमेंटचे प्रमाणही वाढल्याने ई-टेलर्सवर दबाव येत आहे. अशावेळी ग्राहक सेवेची गुणवत्ता राखणे महत्त्वाचे आहे. एसएमई हे आपल्या स्वत:च्या ई-कॉमर्समध्ये ग्राहक अनुभवाला किती मानांकन देतात आणि खुद्द ग्राहक त्याकडे कसे पाहतात, यामधील तफावत १० टक्के इतकी असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. कार्यक्षम परतावा सेवांमध्ये (१३ टक्के) आणि ग्राहक सहाय्यामध्ये (११ टक्के) इतकी एएमईए प्रदेशांत मोठी तफावत दिसून आली.

मालाच्या वितरणाला खूप जास्त वेळ लागतो, ही ग्राहकांची पहिल्या क्रमांकाची (५३ टक्के इतकी) तक्रार आहे. त्यानंतर माल परत घेणे याबाबतच्या तक्रारींचा क्रमांक ( ४२ टक्के) येतो. ग्राहकांना सामान्यत: तीन दिवस ते एका आठवड्याच्या आत मालाचे वितरण होण्याची अपेक्षा असते, परंतु हे वितरण जलद नसल्यास किमान ते अधिक विश्वासार्ह तरी असावे, अशी ग्राहकांची इच्छा असते.

अनेक कामांमध्ये अतिशय अननुभवी कर्मचारी

ई-कॉमर्सचे भविष्य उज्ज्वल दिसत असतानाही, प्राप्त होत असलेल्या वाढत्या ऑर्डर्स हाताळण्याकरीता आपल्याला संघर्ष करावा लागतो, असे एएमईएमधील ६५ टक्के ई-टेलर्सनी म्हटले आहे. या व्यवसायांमध्ये मागणी वाढत असली, तरी कुशल कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि त्यांची भरती या गोष्टी फारच आव्हानात्मक ठरत आहेत, असे दिसून आले आहे.

जागतिक पातळीवर राजीनामा देण्याची जी लाट मध्यंतरी आली होती, तिचा फटका एसएमई उद्योगांना बसला आहे. भारतामधील ८० टक्के एसएमईंनी गेल्या १२ महिन्यांत अत्यंत मोठ्या प्रमाणावरील राजीनाम्यांचा हा अनुभव घेतला आहे. ७१ टक्के एसएमईंचा असा विश्वास आहे की ई-कॉमर्स मार्केटिंग आणि विक्री यांचा अनुभव असलेल्यांना सर्वाधिक मागणी असली, तरी त्यांतील अनेक नोकऱ्यांसाठी खूप कमी उमेदवार उपलब्ध आहेत. लॉजिस्टिक्स या क्षेत्रातही जवळपास हीच परिस्थिती आहे.

भारताव्यतिरिक्त, थायलंड, व्हिएतनाममधील एसएमई उद्योगदेखील याच कुशल कर्मचाऱ्यांच्या टंचाईच्या प्रश्नामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत आणि त्यामुळे या तिन्ही बाजारपेठांमधील एसएमई उद्योगांना लॉजिस्टिक्समधील सेवा देणाऱ्या कंपन्यांवर आपल्या दैनंदिन कामांसाठी, वारंवार कराव्या लागणाऱ्या मालवाहतुकीसाठी अवलंबून राहावे लागत आहे.

लॉजिस्टिक्स पुरवठादार सहाय्यासाठी कायम उपलब्ध

ई-टेलर्स आणि त्यांच्या अंतिम ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यावर दुहेरी लक्ष केंद्रित करून FedEx ही कंपनी एएमईएम प्रदेशांमध्ये ई-कॉमर्सच्या भविष्यातील वाढीस सहयोग देत आहे. ई-टेलर्ससाठी FedEx तर्फे सोपे, सुव्यवस्थित उपाय देण्यात येतात. त्यामुळे त्यांना ऑर्डर पूर्ण करणे सोपे होते. अंतिम-ग्राहकांच्या बाबतीत जलद, विश्वासार्ह आणि ट्रॅक करता येईल असे मालवितरण करणे यालाच सर्वाधिक प्राधान्य FedExकडून देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळून त्यांना समाधान लाभते.

ई-टेलर्सना FedEx ची शिपिंग लेबले उपलब्ध व्हावी आणि FedEx च्या अनेक सेवांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने FedEx आपल्या सेवा आता ई-कॉमर्स मार्केटप्लेसमध्ये समाविष्ट करीत आहे. यामुळे हे ई-टेलर्स आपला प्लॅटफॉर्म न सोडतादेखील FedEx च्या एक्सप्रेस शिपिंग सेवा व आंतरराष्ट्रीय शिपिंग दस्तऐवजीकरण सेवा वापरू शकतील. या अतिशय सुलभ, सुरळीत सेवांमुळे नवीन कर्मचार्यांनाही कामकाज करणे सोपे जाते आणि त्यांच्या कामाचा दर्जा सुधारतो. याव्यतिरिक्त, गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या FedEx® इंटरनॅशनल कनेक्ट प्लस (एफआयसीपी) या सेवेचादेखील विस्तार अलीकडेच एएमईएमधील चौदा बाजारपेठांमधील ई-टेलर्सना लाभ देण्यासाठी करण्यात आला. पैशाचे योग्य मूल्य देणाऱ्या या आंतरराष्ट्रीय शिपिंग सोल्यूशनच्या माध्यमातून एएमईए प्रदेशांमध्ये १ ते ३ दिवसांत बहुतांश शिपमेंट वितरित केल्या जातात. आमच्या सर्वेक्षणानुसार, या वितरणाच्या जलद गतीमुळे ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतात. FedEx® डिलिव्हरी मॅनेजर यांसारख्या डिलिव्हरी कस्टमायझेशन सोल्यूशन्समुळे ई-टेलर्सना आपल्या ग्राहकांना वैयक्तिकृत सेवा देता येते. या ग्राहकांना आपल्या शिपिंगविषयीची प्राधान्ये त्यातून ठरविता येतात आणि ती नियंत्रितही करता येतात. अनेक ग्राहकांची सध्या हीच मोठी मागणी आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande