अहमदाबाद, १९ नोव्हेंबर (हिं.स.) : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य आहे. विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघाचे सर्व गडी बाद (ऑलआऊट) झाले. भारतीय संघाने दिलेल्या माफक आव्हानसामोर आता भारतीय संघाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघ विश्वविजेता होणार की १३० कोटी भारतीयाचे स्वप्नभंग होणार, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
सामना सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले. रोहित शर्माने वादळी सुरुवात करून दिली, पण तो ही बाद झाला. शुभमन गिलला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात केली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शुभमन गिल अवघ्या चार धावा करून माघारी परतला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव संभाळला. पण रोहित नेहमीप्रमाणे मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. सर्वांना अपेक्षा असलेला श्रेयस अय्यर कमाल दाखवू शकला नाही. ११ षटकांत भारतीय संघाने ८१ धावा केल्या, पण त्या बदल्यात आघाडीचे तीन गडी गमावले. त्यानंतर विराट कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या आशा मावळल्या. केएल राहुलने अर्धशतक ठोकलं पण त्याला संघाला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवता आले नाही. ज्यांच्याकडून फिनिशिंगची अपेक्षा होती, त्या रविंद्र जडेजा आणि सुर्यकुमार यादव यांना महत्त्वाच्या टप्प्यावर खेळता आले नाही. त्यामुळे संघाला फक्त २४० धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने भेदक मारा करत तीन, तर जॉश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅडम झम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक गडी तंबूत धाडला.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूत ४६ धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने ३१ चेंडूमध्ये ४७ धावांची खेळी केली. तीन धावांनी रोहित शर्माचे अर्धशतक हुकले. रोहित शर्माने आपल्या छोटेखानी खेळीत तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनेही विकेट फेकली. श्रेयस अय्यरने तीन चेंडूत एका चौकाराच्या मदतीने चार धावा करता आल्या. ८१ धावांत भारतीय संघाने तीन गडी गमावले होते. केएल राहुलने १०७ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने संयमी ६६ धावा केल्या. रविंद्र जाडेजाने २२ चेंडूत ९ धावांचे योगदान दिले. मोहम्मद शमीने १० चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या. जसप्रीत बुमराहला अवघी एक धाव करता आली. कुलदीप यादव आणि सूर्यकुमरा यादव यांनी अखेरीस किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार बाद झाला. सूर्यकुमारने २८ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने फक्त १८ धावा काढून तंबूत परतला. अखेरीस मोहम्मद सिराजने ८ चेंडूत ९ धावांची खेळी केली. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. कुलदीप यादवने १८ चेंडूत १० धावांचे योगदान दिले.
हिंदुस्थान समाचार