आयसीसीकडून विश्वचषकामधील प्लेइंग ११ संघ जाहीर
* भारताच्या सहा, ऑस्ट्रेलियाच्या दोघांचा समावेश नवी दिल्ली, २० नोव्हेंबर (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय क्
प्लेइंग ११ 


* भारताच्या सहा, ऑस्ट्रेलियाच्या दोघांचा समावेश

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विश्वचषक २०२३ मधील प्लेइंग ११ जाहीर केली आहे. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे हा संघ जाहीर केला असून यात भारताच्या सहा, तर विश्वविजेत्या संघातील केवळ दोघांना संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. मात्र त्या पॅट कमिन्सलाच आयसीसीने प्लेइंग ११ मध्ये घेतलेले नाही. प्लेइंग ११ मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीचा समावेश आहे. तर १२ वा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेलार्ड कोएत्जीला ठेवले आहे. विशेष म्हणजे या यादीत पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, नेदरलँड, बांगलादेशचा एकही खेळाडू यात नाही. ऑस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटूंमध्ये अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू एडम झाम्पाचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक सलामीवीर क्विंटन डिकॉक, न्यूझीलंडचा डेरेल मिशेल, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका यांचीही निवड करण्यात आली आहे. आयसीसीने रोहित शर्माला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. यंदाच्या विश्वचषकात धमाकेदार खेळीने लक्ष वेधून घेणारा न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रविंद्र, हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनादेखील आयसीसीच्या संघात स्थान मिळाले नाही.

टीम इंडियाच्या 6 खेळाडूंना आयसीसीच्या संघात स्थान

रोहित शर्माने यंदाच्या स्पर्धेत सलामीला येत स्फोटक फलंदाजी केली. यंदाच्या विश्वचषकात त्याने ५९७ धावा केल्या. विराट कोहलीने ७६५ धावा केल्या. त्या खालोखाल सर्वाधिक धावांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माचा क्रमांक लागतो. रोहितचा स्ट्राइक रेट १२५.९४ इतका राहिला. स्पर्धेतील कोणत्याही आघाडीच्या चार फलंदाजांपेक्षा सर्वाधिक होता. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने स्पर्धेत सर्वाधिक २४ बळी घेतले. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीसोबतच यष्टीमागेही चांगली कामगिरी केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande