चंद्रपूर 20 नोव्हेंबर (हिं.स.): औद्योगिक नगरी गडचांदूर येथे हिंदुस्थान कॉर्पोरेशन तथा वोक्हार्ट फाऊन्डेशन यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील रुग्णांच्या हितासाठी झटणारे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे विशेष प्रयत्न व सहकार्यातून राजूरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्याकरीता उपलब्ध झालेल्या फिरते रुग्णालय सेवा केंद्राचे लोकार्पण गडचांदूर येथे आयोजित कार्यकमात पार पडले.
राजुरा विधानसभा हे दुर्गम क्षेत्र असल्याने या ठिकाणी ग्रामिण क्षेत्रात स्वास्थ्य सुविधांचा अभाव तसेच ग्रामिण कष्टकरी, शेतकरी व अन्य आजारी रुग्णांना कामधंदे सोडून शहराकडे उपचाराकरीता यावे लागते. त्यांना या फिरते रूग्णालय सेवा केंद्रामुळे मोठी सोय होणार असून नागरीकांनी या रुग्णालयाशी नाळ जोडून वैद्यकीय उपचार घ्यावा असे आवाहन हंसराज अहीर यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून केले.
यावेळी हिंदुस्थान कार्पोरेशन लिमीटेडचे उपमहाप्रबंधक मुकूंद जवंजाळ यांनी, सामाजिक दायीत्वाच्या भावनेतून ही सेवा या तालुक्यातील जनतेला देतांना मनस्वी आनंद वाटतो. या आरोग्य सेवेचा लाभ तालुक्यात सर्वदूर पोहचावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वोक्हार्ट फाऊन्डेशन मुंबईचे जितेश लांबीया माजी आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपाचे लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. कटाने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे, डॉ. गायकवाड यांचेसह गडचांदूर, राजुरा, जिवती तालुक्यातील नागरिक बहूसंख्येने उपस्थिती होते.
हिंदुस्थान समाचार