भारत म्हणजे विविध भाषा आणि साहित्याचा सुंदर बागिचा - राष्ट्रपती
भुवनेश्वर, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : भारत म्हणजे विविध भाषा आणि साहित्याचा सुंदर बागिचा असल्याचे राष्ट
President Murmu


भुवनेश्वर, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : भारत म्हणजे विविध भाषा आणि साहित्याचा सुंदर बागिचा असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. ओडिशामधील बारीपाडा येथे अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या 36 व्या वार्षिक संमेलन आणि साहित्य महोत्सवाच्या उद्घाटन सत्रामध्ये आज सहभागी झाल्या.

यावेळी बोलताना राष्ट्रपती मुर्मू यांनी संथाली भाषा आणि साहित्यामध्ये योगदान देणाऱ्या लेखक आणि संशोधकांचे कौतुक केले. अखिल भारतीय संथाली लेखक संघ 1988 साली स्थापन झाल्यापासून संथाली भाषेच्या संवर्धनाचे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये 22 डिसेंबर, 2003 रोजी संथाली भाषेचा समावेश झाला; यानंतर सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रात संथाली भाषेचा वापर वाढला आहे, असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, मुलांना सुरुवातीपासूनच स्वयंअध्ययनात गुंतवून ठेवण्याची गरज आहे. केवळ संथाली साहित्यातच नाही, तर सर्व भारतीय भाषांमध्ये रंजक बालसाहित्य निर्माण करण्यावर भर द्यायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, लेखक हे समाजाचे दक्ष पहारेकरी असतात. ते आपल्या कार्यातून समाजाला जागरूक करतात आणि मार्गदर्शन करतात. स्वातंत्र्यलढ्यात अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखनकार्यातून राष्ट्रीय चळवळीला मार्ग दाखवला. त्यांनी लेखकांना त्यांच्या लेखणीतून समाजात सातत्याने जागृती करण्याचे आवाहन केले. आदिवासी समाजातील लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे महत्त्वाचे काम आहे, यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी भर दिला. त्या म्हणाल्या की, सशक्त आणि जागृत-दक्ष समाजाची निर्मिती, सातत्याने जागरुकता दाखवली तरच शक्य होणार आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, साहित्य हा समाजाच्या संस्कृतीचा आरसा असतो, म्हणजेच समाजातील घटना, गोष्टींचे प्रतिबिंब साहित्यामध्ये पडत असते, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, निसर्गाबरोबर मानवाचे नैसर्गिक सहअस्तित्व आदिवासी जीवनशैलीत दिसून येते. जंगल हे त्यांचे नसून आपण जंगलाचे आहोत असे आदिवासी समाज मानतो, असेही त्या म्हणाल्या. आज हवामान बदल ही एक मोठी समस्या आहे आणि या समस्येचा सामना करण्यासाठी निसर्गाला अनुकूल राहणीमान अत्यंत आवश्यक आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. आदिवासी समाजातील जीवनमूल्ये इतरांपर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी आदिवासी समाजाच्या जीवनशैलीबद्दल जरूर लिहावे, असे आवाहन त्यांनी लेखकांना केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande