* विविध देशांचे ५० क्रू मेंबर असल्याची माहिती
नवी दिल्ली, २० नोव्हेंबर (हिं.स.) : तुर्कस्तानकडून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहतूक जहाजाचे येमेनच्या हुथी बंडखोरांनी अपहरण केले आहे. जहाजामध्ये विविध देशांचे ५० क्रू मेंबर असल्याचे सांगितले जात आहे. इस्राइली लष्कराने ट्विट करून या संदर्भातील माहिती दिली आहे.
ट्विटमध्ये म्हटले आहे की, येमेनजवळील दक्षिण लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी मालवाहू जहाजाचे अपहरण केले आहे. हा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत गंभीर आहे. जहाज तुर्कस्तानमधून भारताकडे निघाले होते. यामध्ये विविध देशांचे कर्मचारी सदस्य आहेत. यात कोणी इस्राइली नागरिक नसून जहाज देखील इस्राइलचे नाही.
इस्राइलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रकरणी ट्विट करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय जहाजावर केलेल्या इराणच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जहाजाची मालकी ब्रिटिश कंपनीची असून त्याला जपानची फर्म चालवते. इराणच्या मार्गदर्शनानुसार येमेनच्या हुथी अतिरेक्यांनी या जहाजाचे अपहरण केले असल्याचे म्हटले आहे.
हुथी बंडखोरांनी इस्राइली जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. इस्राइलच्या मालकीच्या किंवा त्यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यात येईल, असे म्हटले होते.
हुथी बंडखोरांच्या प्रवक्त्याने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यात इतर देशांनी याकडे लक्ष देण्याची आणि अशा जहाजांवर काम करणाऱ्या आपल्या नागरिकांना परत बोलावण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार