दहशतवादी पन्नु विरोधात गुन्हा दाखल
भारतीय विमान उडवण्याची दिली होती धमकी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केला गुन्हा नवी दिल्ली, 20 नो
गुरपतवंत सिंग पन्नू


भारतीय विमान उडवण्याची दिली होती धमकी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केला गुन्हा

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : परदेशात लपून कारवाया करणारा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज, सोमवारी पन्नू विरोधात गुन्हा दाखल केलाय.

शिख फॉर जस्टिसचा संस्थापक असलेल्या पुन्नू याने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना बॉम्बने उडवण्याची धमकी त्याने दिली होती. याप्रकरणी एनआयएने पन्नूविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 बी, 153 ए आणि 506 आणि कलम 10, 13, 16, 17, 18, 18 बी आणि बेकायदेशीर क्रियाकलापांच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी पन्नू याने व्हिडिओ जारी करत शीखांना एअर इंडियाच्या विमानात न बसण्याचा इशारा दिला होता. असे करणाऱ्यांना आपला जीव गमवावा लागेल, अशी धमकी पन्नूने दिली होती. एवढेच नाही तर त्याने एअर इंडियाला जगभरातील उड्डाणे बंद करण्याची धमकीही दिली होती. पन्नूच्या या धमक्यांनंतर सुरक्षेसह मोठ्या प्रमाणावर तपास सुरु करण्यात आला होता. कॅनडा आणि भारतामध्ये तसेच एअर इंडियाच्या उड्डाणे चालणाऱ्या सर्व देशांमध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते. तसेच 19 नोव्हेंबरला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात यावे, अशी धमकीही पन्नूने भारत सरकारला दिली होती. नवी दिल्ली इथे असलेले हे विमानतळ जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.

एनआयएने म्हटले आहे की, पन्नू पंजाबच्या मुद्द्यांवर, विशेषत: देशातील शीख आणि इतर समुदायांमध्ये वैर वाढेल अशी वक्तव्ये करत आहे. पन्नूने यापूर्वीही धमक्या दिल्या आहेत. यामध्ये त्याने भारतातील रेल्वे तसेच औष्णिक वीज प्रकल्पांसह अत्यावश्यक वाहतूक नेटवर्क यंत्रणांना धोका पोहोचवू अशी धमकी दिली होती. गृह मंत्रालयाने 10 जुलै रोजी एसएफजे संघटनेवर बंदी घातली होती. तर 1 जुलै 2020 रोजी केंद्राने पन्नूला दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केले होते. दुसरीकडे, पन्नू 2019 पासून एनआयएच्या रडारवर आहे. त्यानंतर दहशतवादविरोधी संस्थेने त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल केला होता. या वर्षी सप्टेंबरमध्ये एनआयएने अमृतसर (पंजाब) आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशातील सूचीबद्ध दहशतवाद्याचे घर आणि जमीन जप्त केली होती. एनआयएच्या विशेष न्यायालयाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी पन्नूनविरुद्ध अटकेचे अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande