रत्नागिरी, 20 नोव्हेंबर, (हिं. स.) : ऐन दिवाळीत आणि पंढरपूरच्या वारीदरम्यान एसटी महामंडळाने केलेल्या प्रवासी भाडेवाढीविरोधात गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाने (मुंबई) निषेध आंदोलनाचा इशारा दिला होता; परंतु मुंबई आगारात लागलेली आग, मराठा आरक्षणासंदर्भात चालू असलेली आंदोलने, दिवाळी सण आणि कार्तिकी वारीनिमित्त पंढरीरायाचे दर्शन या सर्वांचा विचार करून आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली.
हंगामी प्रवासी भाडेवाढ केली नसती तरीही एसटीचा महसूल वाढला असता, असेही ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून दिवाळी सणात हंगामी प्रवासी भाडेवाढ करण्याचा पायंडा पडला आहे; पण ही दिवाळी सणादरम्यान १० दिवसांसाठी असायची. त्यामुळे पंढरपूरच्या कार्तिकवारीस जाणाऱ्या वारकरी प्रवाशांना याची झळ पोहोचत नव्हती; पण यावर्षी २० दिवसांकरिता हंगामी प्रवासी भाडेवाढ करून प्रवाशांनाही वेठीस धरण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप श्री. चव्हाण यांनी केला.
आता दिवाळी हंगाम संपला आहे. त्यामुळे वारकरी कार्तिकीवारीला पंढरपूरला जायला सुरवात होणार आहे. त्यामुळे १० टक्के हंगामी प्रवासी भाढेवाढ रद्द करून वारकरी प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी कार्याध्यक्ष दीपक चव्हाण आणि पंढरपूर यात्रा-वारकरी विभागाचे गंगाराम खांडेकर यांनी केली आहे.
हिंदुस्थान समाचार