भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करू- अमित शाह
हैदराबाद, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : तेलंगणात भाजपला बहुमत मिळाले तर मुस्लिम धर्मियांचे 4 टक्के आरक्षण
अमित शाह


हैदराबाद, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : तेलंगणात भाजपला बहुमत मिळाले तर मुस्लिम धर्मियांचे 4 टक्के आरक्षण रद्द केले जाईल अशी घोषणा अमित शाह यांनी केली. तेलंगणातील जानगाव येथे आयोजित रॅलीत ते बोलत होते.

याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, भाजपला सत्ता मिळाल्यास तेलंगणातील 4 टक्के मुस्लिम आरक्षण रद्द करण्यात येईल. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना गृहमंत्री शहांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना म्हटले की, तुष्टीकरणाच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी येथे मुस्लिम आरक्षण देण्यात आले आहे. तेलंगणाच्या आगामी विधानसभा निवडणुका देशाचे भवितव्य ठरवतील. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर येथील जनतेला अयोध्येत भगवान श्रीरामाचे दर्शन मोफत देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी केले.अमित शहांनी भारत राष्ट्र समितीच्या नेतृत्वाखालील केसीआर सरकारमधील भ्रष्टाचारावर हल्ला केला आणि त्यांच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल, असेही सांगितले. ज्याने भ्रष्टाचार केला असेल तो तुरुंगात जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

केंद्र सरकारचे कौतुक करताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने झपाट्याने प्रगती केली आहे. ओवेसींच्या भीतीने केसीआर हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस साजरा करत नाहीत. केसीआर यांनी दिलेले वचन मोडल्याचा आरोपही त्यांनी केला. जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात ते काम करत आहेत. त्यांचे आमदार फक्त जमिनीवर कब्जा करतात. भाजप घराणेशाही करत नाही, मात्र येथील तिन्ही पक्षांमध्ये घराणेशाही शिगेला पोहोचली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande