डोंबिवली, २० नोव्हेंबर, (हिं.स.) : भररस्त्यात एका रिक्षाचालकाला मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची चैन हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रविवारी अंतर्ली गावाजवळील नाना धाब्यालगत घडला. याप्रकरणी पोलीस या टोळीचा कसून शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता कुभांरकर दादु या रिक्षाचालकाच्या फिर्यादिवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादू हे आपली रिक्षा घेऊन डोंबिवली पूर्वेकडील हेदुटने जवळून जात असताना अंतर्ली गावाजवळील नानाचा ढाब्यासमोर एक अज्ञात महिला, दुचाकीवरील एक अनोळखी इसम आणि कारमधुन आलेले दोन अनोळखी इसम यांनी दादू यांच्यावर अचानक हल्ला करत मारहाण केली. दादू यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने खेचुन ही टोळी दुचाकी व कारमधून पसार झाले. घाबरलेल्या दादू यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेचा पोलीस उप निरीक्षक बी.एस. ढेंबरे अधिक तपास करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार