भारत-नेपाळ यांच्यात सतरावा 'सूर्यकिरण लष्करी सराव' सुरू
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : भारत आणि नेपाळ यांच्यात 17 व्या 'सूर्यकिरण संयुक्त लष्करी सरावात
Military Exercise


Military Exercise


नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : भारत आणि नेपाळ यांच्यात 17 व्या 'सूर्यकिरण संयुक्त लष्करी सरावात' सहभागी होण्यासाठी नेपाळच्या लष्करातील 334 जणांची तुकडी भारतात दाखल झाली आहे. उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे आजपासून 7 डिसेंबरपर्यंत हा सराव चालणार आहे. दरवर्षी हा सराव केला जात असून दोन्ही देश आळीपाळीने त्याचे आयोजन करतात.

या सरावात भारतीय लष्करातील 354 जणांची तुकडी सहभागी झाली असून तिचे नेतृत्व कुमाऊँ रेजिमेंटच्या बटालियनकडे आहे. नेपाळच्या लष्करी तुकडीचे प्रतिनिधीत्व तारा दल बटालियन करत आहे.

या सरावाचे उद्दिष्ट जंगलातले युद्ध, पर्वतीय भूभागातील दहशतवादविरोधी मोहिमा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेअंतर्गत शांती मोहिमांमध्ये मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणामध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे हे आहे. सरावामध्ये, ड्रोन आणि काउंटर ड्रोन उपाय, वैद्यकीय प्रशिक्षण, विमानचालनाशी संबंधित बाबी आणि पर्यावरण संवर्धन यावर भर दिला जाईल. या उपक्रमांद्वारे, सैनिकांना आपली कार्यान्वयन क्षमता वाढवता येईल, त्यांची लढाऊ कौशल्ये सुधारता येतील आणि आव्हानात्मक परिस्थितीत समन्वय बळकट करता येईल.

हा सराव भारत आणि नेपाळमधील सैनिकांना कल्पना आणि अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी, सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करण्यासाठी आणि एकमेकांच्या कार्यान्वयन प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल.

सूर्यकिरण सराव, भारत आणि नेपाळ यांच्यातील मैत्री, विश्वास, समान सांस्कृतिक संबंधांचे मजबूत बंध दर्शवतो. व्यापक संरक्षण सहकार्याप्रती दोन्ही देशांची अतूट बांधिलकी दाखवून उत्तम फलनिष्पत्तीसाठी मंच पुरवतो. सामायिक सुरक्षा उद्दिष्टे साध्य करणे आणि दोन मैत्रीपूर्ण शेजारी देशांमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करणे, हे या सरावाचे उद्दिष्ट आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande