डगमगणाऱ्या जगाला भारतच मार्ग दाखवेल- मोहन भागवत
सांस्कृतिकदृष्ट्या जगाला जोडण्याचे केले आवाहन थायलंडमध्ये तिसऱ्या जागतिक हिंदू काँग्रेसचा शुभारंभ
डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक


सांस्कृतिकदृष्ट्या जगाला जोडण्याचे केले आवाहन

थायलंडमध्ये तिसऱ्या जागतिक हिंदू काँग्रेसचा शुभारंभ

बँकॉक, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : जगाने आजवर भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीच्या प्रयोगाचा अनुभव घेतला. परंतु, त्यानंतरही अस्वस्थतेने जग डगमगते आहे. या डगमगणाऱ्या जगाला आनंद आणि समाधानाचा मार्ग भारत दाखवेल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते आज, शुक्रवारी थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक येथे आयोजित तिसऱ्या विश्व हिंदू काँग्रेसच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.

जागतिक हिंदू काँग्रेस दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. यावेळी वर्ल्ड हिंदू फाउंडेशनने थायलंडची राजधानी बँकॉक येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 24 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा कार्यक्रम रविवार, 26 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभ सत्रात आज, शुक्रवारी सरसंघचालक म्हणाले की, आनंद आणि शांती मिळावी म्हणून जगाने गेल्या 2 हजार वर्षापासून भौतिकवाद, भांडवलशाही आणि साम्यवादाचे प्रयोग केलेत. परंतु, त्यानंतरही जग डगमगत आहे, चाचपडत आहे. त्यांनी अनेक धर्मांशी संबंधित प्रयोगही केले. त्यांना भौतिक समृद्धी मिळाली. मात्र, समाधान मिळाले नाही. आता कोरोना साथरोगानंतर जगाने यावर पुनर्विचार करायला सुरुवात केली आहे. आता, भारतच मार्ग दाखवेल यावर त्यांचे एकमत झाल्यासारखे वाटत आहे. आपल्याला सर्वांशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना आपल्या सेवांच्या माध्यमाने आमच्याकडे आणावे लागेल. आपल्याकडे उत्साह आहे. निःस्वार्थ सेवेसाठी आपण जगात अग्रेसर आहोत. हे आपल्या परंपरा आणि मूल्यांमध्ये आहे. यामुळे लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांची मने जिंका' असेही आवाहन डॉ. भागवत यांनी केले.

हिंदू परंपरांमध्ये काही मतभेद असू शकतात. परंतु, आपण सर्वत्र जातो, प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, काही लोक सहमत असतात आणि काही नाही, मात्र, आपण सर्वांशी जोळवून घेतो असे सरसंघचालकांनी सागंतले. यावेळी डॉ. भागवतांनी सांगितले की, धर्माच्या विजयावर आमचा विश्वास आहे. यावर आपला धर्म अवलंबून आहे. ही प्रक्रिया धर्माच्या नियमांवर आधारित आहे आणि परिणामी धर्म आपल्यासाठी कर्तव्य बनतो. 'आम्ही धन विजय आणि आसुरी विजय अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद, पण यात हेतू बरोबर नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे. देशाने (ब्रिटिशांचा) 250 वर्षे संपत्तीचा विजय पाहिला. आसुरी विजय म्हणजे इतर समुदायांप्रति आक्रमकतेची भावना असणे. परकीय आक्रमकांनी भारतात 5200 वर्षे राज्य केले. यामुळे आमच्या भूमीवर नासधूस झाल्याचे सरसंघचालकांनी यावेळी नमूद केले.

तिसऱ्या जागतिक हिंदू काँग्रेस परिषदेची संकल्पना 'जयस्य आयतनं धर्म:' अशी ठेवण्यात आली आहे. त्याचा अर्थ- 'धर्म, विजयाचा आधार.' ही परिषद 26 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये हिंदूंच्या कर्तृत्वासोबत जगातील अनेक क्षेत्रांत हिंदूंवर होत असलेले भेदभाव, अत्याचार आणि त्यांना सामोरे जाण्याचे मार्ग यावरही चर्चा होणार आहे. पहिली जागतिक हिंदू काँग्रेस 2014 मध्ये दिल्लीत आयोजित करण्यात आली होती आणि दुसरी परिषद शिकागो, यूएसए येथे 2018 मध्ये आयोजित करण्यात आली होती. कोरोना कालावधीमुळे तिसरा कार्यक्रम लांबला. वर्ल्ड हिंदू फाउंडेशनने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande