आ. संजय केळकर साकारणार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका
ठाणे, 28 नोव्हेंबर (हिं.स.) आमदार संजय केळकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका तर प्रा.डाॅ.प्रदी
आ. संजय केळकर साकारणार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका


ठाणे, 28 नोव्हेंबर (हिं.स.) आमदार संजय केळकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका तर प्रा.डाॅ.प्रदीप ढवळसर हे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहेत. माॅरिशस येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीयस्तरीय 'हृदयगंम - मराठी साहित्य संमेलनातील नाटकात या भूमिका ते सादर करणार आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २ व ३ डिसेंबर २०२३ रोजी, १७ वे केंद्रीयस्तरावरील साहित्य संमेलन अर्थात आंतरराष्ट्रीयस्तरीय 'हृदयगंम - मराठी साहित्य संमेलन' माॅरिशस येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कोमसापच्या वतीने खास माॅरिशस मधील मराठी भाषिकांसाठी 'स्वराज्य निष्ठा' या नव्याकोऱ्या नाटकाचा पहिलाच प्रयोग सादर केला जाणार आहे. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजन बने यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय केळकर हे छत्रपती शिवाजी महाराज व प्रा.डाॅ.प्रदीप ढवळसर हे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहेत.

'स्वराज्य निष्ठा' या नाटकातील भूमिकेत, छत्रपती शिवाजी महाराज - आमदार संजय केळकर, छत्रपती संभाजी महाराज- प्रा.डाॅ.प्रदीप ढवळसर, माँसाहेब जिजाऊ- प्राचार्या डाॅ. हर्षला लिखिते, सोयराबाईं- वैदेही कोलंबकर, हंबिरराव- सुशील वाघुले, दिलेरखान- अमित मोरे, अनाजीपंत- डाॅ. जे. बी. भोर, मुशर्रफखान- राहूल निळे, शाहीर- आकाश ढवळ, नर्तकी- डाॅ. प्रांजल ढवळ, कलाकार- सीमा हर्डीकर तर औरंगजेबाची भूमिका राजन बने हे साकारणार आहेत. या नाटकाचे सह दिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू हे आहेत. पार्श्वसंगीत वैभव पटवर्धन यांनी दिले आहे तर ध्वनी व संवाद प्रसिद्ध अभिनेते उदय सबनीस यांनी दिले आहे. आनंद विश्व गुरुकुल व कोकण मराठी साहित्य परिषद या संस्थेच्या कलाकारांनी या नाटकात आपले योगदान दिले आहे.

या संदर्भात बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की, मी मुळात कलासरगमचा कलाकार. सुरुवातीला काही नाटकात भाग घेतला होता. पण विवेकानंदांवरील नाटकात रामकृष्ण परमहंस यांची मी केलेली भूमिका प्रचंड गाजली. २२५ प्रयोग मराठीत झाले व हिंदीत ६ प्रयोग झाले. ही भूमिका अध्यात्मिक स्वरुपाची होती. आता साक्षात शिवछत्रपतींची भूमिका साकारण्याचा योग आला आहे. अनेक मान्यवरांनी शिवछत्रपतींची भूमिका गाजविली आहे. हे शिवधनुष्य मी ही आता उचलणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा विश्वस्त व कोकण कला अकादमीचा प्रमुख म्हणून माॅरिशस येथे मराठी साहित्य संमेलनासाठी जात असताना माॅरिशस मधील शिवभक्त मराठी भाषिकांसमोर शिवछत्रपतींची भूमिका मी साक्षात जगणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande