जम्मूत तिसऱ्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांसाठीचा शुभंकर, संकल्पना गीत, जर्सीचे अनावरण
गुलमर्ग येथे 10 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धांचे आयोजन जम्मू-काश्मीर
अनावरण


अनावरण


गुलमर्ग येथे 10 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धांचे आयोजन

जम्मू-काश्मीरच्या काना-कोपऱ्यात क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये केल्या जात असलेल्या सुधारणा तरुणांना क्रीडा क्षेत्रासाठी प्रोत्साहित करत आहेत : नायब राज्यपाल

खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा युवकांना खेळात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देतील आणि त्यातून भारताला जागतिक पटलावर क्रीडाविषयक सुप्त शक्ती म्हणून प्रस्थापित होणे शक्य होईल : अनुराग सिंह ठाकूर

जम्मू, 4 फेब्रुवारी (हिं.स.) : केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान तसेच युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह आज जम्मू येथील राजभवनात तिसऱ्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धांसाठीचा शुभंकर, संकल्पना गीत आणि जर्सी यांचे अनावरण केले.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांचे आयोजन हा खेलो इंडिया अभियानाचाच एक भाग आहे. देशातील युवकांना खेळात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि भारताला जागतिक पटलावर क्रीडाविषयक सुप्त शक्ती म्हणून प्रस्थापित करणे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खेलो इंडिया अभियानाची सुरुवात करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

गेल्या आठ वर्षांपासून, युवकांनी खेळांमध्ये भाग घेण्याबाबतची देशातील कुटुंबांची मानसिकता मोठ्या प्रमाणात बदलली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या खेलो इंडिया अभियान तसेच फिट इंडिया अभियान यांच्या माध्यमातून हे शक्य झाले असे देखील केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केवळ क्रीडाविषयक पायाभूत सुविधा सुधारण्यात आल्या आहेत असे नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरु होण्याआधी किंवा त्या स्पर्धांमध्ये जागतिक पातळीवर भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्यानंतर स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंशी पंतप्रधानांनी त्या त्या वेळी साधलेल्या संवादातून देखील देशातील युवावर्गाला खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहिले आहे.

खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धांविषयी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, देशातील 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील दीड हजारहून अधिक खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. यामुळे जम्मू-काश्मीरमधील युवकांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेलच पण त्याच बरोबर यातून जम्मू काश्मीरमधील पर्यटनाला देखील चालना मिळेल. काश्मीरच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होणारे खेळाडू तसेच इतर अधिकारी आणि गेल्या काही वर्षांपासून जम्मू काश्मीर भागात घडवण्यात आलेले बदल हे जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन, शांतता आणि आणि स्थैर्य यांना प्रोत्साहन देणारे सदिच्छादूत म्हणून कार्य करतील, असे ते पुढे म्हणाले.

खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेच्या शुभंकर, संकल्पना गीत आणि जर्सीच्या अनावरणप्रसंगी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे अभिनंदन करून ठाकूर म्हणाले, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभामुळे देशभरात असा संदेश जाईल की,एक अविस्मरणीय रोमांच आणि अनुभव प्रदान करणारे हे खेळ पाहण्यासाठी जम्मू-कश्मीर त्यांची वाट पाहत आहे. या क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणी झालेल्या शुभारंभामुळे येथील तरुणांना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करता येईल आणि त्यांना तयारीसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देता येतील,असेही ठाकूर म्हणाले.

या क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, पीएमडीपी अंतर्गत, जम्मू आणि काश्मीरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात क्रीडा पायाभूत सुविधा सुधारल्या गेल्या आहेत, ज्यामुळे तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहन मिळत आहे. सिन्हा म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक पंचायतीमध्ये क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत आणि 50 लाख तरुणांना क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे लक्ष्य पार केले आहे. नवीन क्रीडा धोरणाच्या माध्यमातून खेळाडूंना करिअरचे आकर्षक पर्याय उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.

या हिवाळी क्रीडा स्पर्धा, या महिन्यात 10 ते 14 तारखेपर्यंत जम्मू आणि काश्मीर मधील गुलमर्ग येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे समर्थन आहे आणि या स्पर्धा जम्मू आणि काश्मीर क्रीडा परिषद तसेच जम्मू आणि काश्मीर हिवाळी क्रीडा संघटनेद्वारे आयोजित केल्या जातात. गुलमर्ग येथे होणाऱ्या या क्रीडास्पर्धा मध्ये देशभरातील 1500 हून अधिक खेळाडू सहभागी होतील आणि 9 क्रीडा प्रकारांमध्ये या स्पर्धां खेळल्या जातील. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा पहिल्यांदा वर्ष 2020 मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आणि जम्मू आणि काश्मीर आतापर्यंत या दोन्ही क्रीडा स्पर्धांमध्ये आघाडीवर राहिला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande