शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न केंद्र-राज्य सरकारला सोडविता आले नाहीत - चंद्रशेखर राव
नांदेड, 5 फेब्रुवारी (हिं.स.) : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील अनेक गावांत पिण्याचे पाणी न
शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न केंद्र-राज्य सरकारला सोडविता आले नाहीत - चंद्रशेखर राव


नांदेड, 5 फेब्रुवारी (हिं.स.) : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील अनेक गावांत पिण्याचे पाणी नाही. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत ही खेदाची बाब आहे, असे म्हणत चंद्रशेखर राव यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. भारत राष्ट्र समितीतर्फे (बीआरएस) आयोजित सभेत ते बोलत होते.

अब की बार किसान सरकार घोषणाबाजी करण्यात आली. देशामध्ये आज परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारला सोडविता आले नाहीत. देशात आता शेतकऱ्यांचे सरकार यायला पाहिजे भारत राष्ट्र समिती संपूर्ण देशभर पक्ष विस्तार करणार असून त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातल्या गुरुगोविंद सिंग जी यांच्या पावन भूमीने पदस्पर्श झालेल्या नांदेड येथून होत असल्याचे राव यांनी सांगितले. देशात गरजेपेक्षा जास्त पाणी उपलब्ध आहे. सरासरी एक लाख टीएमसी पाऊस पडतो. त्याचे योग्य नियोजन केले तर आणि सरकारची इच्छा असेल, तर देशातील सर्वच भागातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकतो. देशाला किमान शंभर वर्ष तरी पाणीटंचाई भासत नाही . त्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. तेलंगणा राज्यात नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात असल्याचेही राव यांनी यावेळी सांगितले.

आगामी काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भारत राष्ट्र समिती ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवणार असून लोकसभा विधानसभा निवडणुकीत महिलांना संधी देणार असल्याचेही राव यांनी सांगितले.

सभेपूर्वी नांदेडच्या गुरुगोविंद सिंग जी विमानतळावर चंद्रशेखर राव यांचे आगमन झाले. शहरातील दर्शनी भागात बॅनर पोस्टर, पताके मोठ्या प्रमाणात लावण्यात आली होती. मागील आठ दिवसापासून रेल्वे स्थानक परिसरातील गुरुद्वारा बोर्डाच्या जागेवर भारत राष्ट्र समितीच्या पक्ष मेळाव्याची जय्यत तयारी सुरू होती . आकर्षक मंडप नांदेडकरांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी जहीराबादचे खासदार बी.बी. पाटील, बोधनचे आमदार शकील अहमद, डॉ. दत्तात्रय मोरे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून शेकडो कार्यकर्ते पक्ष मेळाव्यासाठी आले होते. अंदाजे पाच ते दहा हजाराच्या वर कार्यकर्ते मेळाव्यात उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande