1st ODI : भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय
॰ मालिकेत १-० ने आघाडी मुंबई, १७ मार्च (हिं.स.) : येथील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या एकद
ODI India 


॰ मालिकेत १-० ने आघाडी

मुंबई, १७ मार्च (हिं.स.) : येथील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सिराज आणि शमी यांची गोलंदाजी, तसेच केएल राहुलचे अर्धशतक आणि रविंद्र जाडेजाच्या संयमी खेळीच्या बळावर भारताने विजयश्री आपल्याकडे खेचून आणली.

भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १८८ धावांत संपुष्टात आला. त्या धावांचा करताना भारतीय संघाची सुरुवात काहीशी खराब झाली होती. पण केएल राहुलचे अर्धशतक आणि रविंद्र जाडेजाची संयमी खेळीच्या बळावर भारताने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८९ धावांचे आव्हान भारताने पाच गडी राखून सामन्यावर आपली पकड मिळवली.

स्मिथ आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभळला. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली होती. ही जोडी धोकादायक होतेय असे वाटत असतानाच हार्दिक पांड्याने स्मिथला बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतले. मिचेल मार्श याने एक बाजू लावून धरली होती. पण जाडेजाने मार्शला बाद केले. परिणामी ऑस्ट्रेलियाचा डाव ३५ षटकांत १८८ धावांत संपुष्टात आला. भारताकडून सिराज आणि शमी यांनी भेदक गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन तीन, रविंद्र जाडेजाने दोन, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

अवघ्या ३९ धावांत भारताने आघाडीचे चार फलंदाज गमावले. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी डाव सांभाळला. त्यांची जोडी जमली असे वाटत असतानाच हार्दिक पांड्या बाद झाला. त्यानंतर राहुल आणि रविंद्र जाडेजा या जोडीने नाबाद राहत भारताला विजय मिळवून दिला. राहुलने नाबाद ७५, तर रविंद्र जाडेजाने नाबाद ४५ धावांची खेळी केली. त्याशिवाय हार्दिक पांड्याने २५ धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. इशानने ३, गिलने ३१ चेंडूत २०, विराट कोहली ४, तर सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने ३१ चेंडूत २५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने भेदक मारा करत तीन, तर स्टॉयनिसने दोन गडी बाद केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande