लवकर तपासणी, निदान, उपचार, इन्फ्लूएंझाला करू हद्दपार
गेले महिनाभरापासून सर्वत्र इन्फ्लूएंझाचा संसर्ग वाढत आहे. सर्दी, ताप, खोकला यासारख्या लक्षणांनी नागर
इन्फ्लूएंझा


गेले महिनाभरापासून सर्वत्र इन्फ्लूएंझाचा संसर्ग वाढत आहे. सर्दी, ताप, खोकला यासारख्या लक्षणांनी नागरिक त्रस्त आहेत. इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार असून, याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, घ्यावयाची काळजी याची माहिती देणारा लेख…

उपप्रकार - इन्फ्लूएंझा टाईप ए चे एच 1 एन 1, एच 2 एन 2, एच 3- एन 2 हे उपप्रकार आहेत.

इन्फ्लुएंझा (फ्लू) ची लक्षणे - ताप, खोकला, घसादुखी, घशाला खवखव, धाप लागणे, अंगदुखी, डोकेदुखी, नाक गळणे, इतर कोणतेही निदान झालेले नसणे.

इन्फ्लूएंझा टाळण्यासाठी काय करावे?

हे करा - वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत, पौष्टिक आहार घ्यावा, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा.

पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे,

हे करू नका – हस्तांदोलन, धुम्रपान, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका, आपल्याला फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका,

इन्फ्लूएंझा रुग्णांसाठी घ्यावयाची काळजी

रुग्णाकरिता वेगळी खोली निश्चित करावी. रुग्णाने स्वतः नाकावर रुमाल बांधावा. रुग्णाने धुम्रपान करू नये. रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी आणि द्रव पदार्थ घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. दिवसातून किमान दोनवेळा गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या कराव्यात, तसेच गरम पाण्याची वाफ घ्यावी.

रुग्णाने शक्यतो बैठकीच्या खोलीत, ज्या ठिकाणी सर्व कुटुंबीय असतील तेथे येणे टाळावे.

रुग्णाने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये. घरात ब्लीच द्रावण तयार करावे. याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णाचा स्पर्श होतील असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा.

रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात, ब्लीच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत.

रुग्णाचे अंथरूण - पांघरूण, टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत.

ताप आणि फ्ल्यूची इतर लक्षणे संपल्यानंतर किमान 24 तासापर्यंत घरी रहावे.

रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क कुठेही टाकू नयेत.

रुग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तिने करावी.

नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहणे गरजेचे आहे. लवकर तपासणी जीवन वाचवते. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हंगामी ताप (SEASONAL FLU)

याशिवाय हंगामी ताप (SEASONAL FLU) या आजाराचेही प्रमाण वाढत आहे. हंगामी ताप हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो गंभीर असू शकतो. त्यामुळे खूप उशीर होण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे.

हंगामी ताप व्यक्ती ते व्यक्ती, खोकणे आणि शिंकणे यातून श्वासाद्वारे, हात आणि पृष्ठभागावर पडलेले थेंब याद्वारे पसरतो.

या लोकांना अधिक धोका - गर्भवती महिला, लहान बाळ, ज्येष्ठ नागरिक, रोगप्रतिकारक क्षमतेची कमतरता असलेल्या व्यक्ती, वैद्यकीय आणि सर्जिकल आजार असलेल्या व्यक्ती, दीर्घकालीन औषधे घेणारे रूग्ण.

लक्षणे – ताप, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, धाप लागणे ही लक्षणे दिसू लागताच 48 तासांच्या आत तपासणी करून घ्यावी. लवकर तपासणी जीवन वाचवते.

प्रतिबंधात्मक उपाय - शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकावे, आपले हात नियमितपणे साबण आणि पाण्याने धुवावेत, आपले डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळावे, सतर्क रहावे, विलगीकरणात रहावे, भरपूर द्रव प्यावे, स्वतःहून औषध घेणे टाळावे, टिश्यू पेपरचा पुनर्वापर टाळावा, हस्तांदोलन करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

– जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande