किसान मोर्चाच्या ७० टक्के मागण्या मान्य, लाँग मार्च अखेर स्थगित
* शेतकरी नेते जे.पी. गावित यांनी केले जाहीर मुंबई, १८ मार्च (हिं.स.) : नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघ
जे.पी. गावित


* शेतकरी नेते जे.पी. गावित यांनी केले जाहीर

मुंबई, १८ मार्च (हिं.स.) : नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित करत असल्याचे शेतकरी नेते माजी आमदार जे.पी. गावित यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांचा लाँग मार्च ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे आहे. दरम्यान तेथे आयोजित पत्रकार परिषदेत गावित बोलत होते.

आमच्या ७० टक्के मागण्या मान्य

गावित म्हणाले की, सरकारने आमच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ही माहिती देऊन त्याबाबतचे निवेदन पटलावर ठेवले आहे. सर्व मोर्चेकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. तसेच, उर्वरित मागण्याही लवकरच मान्य होतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत.

प्रशासनासह सरकारचे आभार

तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवेदनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगतानाच गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले.

गावित पुढे म्हणाले की, काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूणच या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम्ही आंदोलकांना विश्वासात घेतले. त्यानुसार आता आम्ही आंदोलन मागे घेत आहोत.

व्हिडिओ गावागावात दाखवण्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन हे समाधानकारक आहे. मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेतही निवेदन दिले आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गावागावात दाखवला पाहिजे असे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. मोर्चेकरी समाधानी आहे. काही उरलेल्या मागण्या लवकरच पूर्ण होणार आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande