आज देशात श्वेतक्रांती-2 ची गरज - अमित शाह
अहमदाबाद, 18 मार्च (हिं.स.) : आज देशात श्वेतक्रांती-2 ची गरज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
Amit Shah


अहमदाबाद, 18 मार्च (हिं.स.) : आज देशात श्वेतक्रांती-2 ची गरज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण या दिशेने वाटचाल करत आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. गुजरातमध्ये गांधीनगर येथे आज भारतीय डेअरी संघटनेच्या वतीने आयोजित 49 व्या डेअरी उद्योग परिषदेला अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमात उपस्थिती होती.

दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सहकारी मॉडेल उत्पन्न, पोषण, पशुधनाची काळजी, मानवी हिताचे संरक्षण, रोजगार आणि महिला सक्षमीकरण या सर्व बाबींना स्पर्श करते. संपूर्ण व्यवस्थेतील शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील मध्यस्थांचे उच्चाटन करून, सहकाराचे मॉडेल शेतकऱ्याला जास्तीत जास्त नफा मिळवून देते, असे शहा म्हणाले. सहकारी मॉडेल शेतकऱ्याला जास्तीत जास्त नफा मिळवून देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सहकार मॉडेल बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

दुग्धव्यवसाय हा जगासाठी एक व्यवसाय असला तरी पण भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्येच्या देशात तो रोजगाराचा स्रोत आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा पर्याय आहे,कुपोषणाच्या समस्यांवर उपाय आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रचंड क्षमता असलेले क्षेत्र आहे, असे अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर डेअरी उद्योगाच्या विकासाकडे पाहिले, तर हे लक्षात येते की, डेअरी क्षेत्राने या सर्व बाबींना देशाच्या विकासाशी योग्यरित्या जोडण्याचे काम केले आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी काम करणाऱ्या सहकारी डेअरींचे यात मोठे योगदान आहे. सहकारी डेअरीने देशातील गरीब महिला शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे, असे शहा यांनी सांगितले. “सहकारातून समृद्धी” हा मंत्र पूर्णत्वाला नेण्यासाठी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय डेअरी संघटनेची स्थापना स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये झाली आणि या संघटनेचे देशातील डेअरी क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्र्यांनी सांगितले. भारताचे डेअरी क्षेत्र जगात सर्वात बळकट बनवण्यासाठी या परिषदेत सर्वसमावेशक चर्चा करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्राचा देशाच्या जीडीपीमध्ये 4.5 टक्के वाटा आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये दुग्धव्यवसाय क्षेत्राचे योगदान 24 टक्के असून याचे मूल्य सुमारे 10 लाख कोटी रुपये आहे आणि ते जगात सर्वाधिक आहे, असे त्यांनी सांगितले. दुग्धव्यवसाय हा आपल्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत हिस्सा आहे आणि रोजगाराच्या बाबतीत, 9 कोटी ग्रामीण कुटुंबांतील सुमारे 45 कोटी लोक, विशेषत: अल्पभूधारक शेतकरी आणि महिला, आज थेट दुग्धव्यवसाय क्षेत्राशी निगडीत आहेत, असे शहा म्हणाले.

गेल्या दशकात आपल्या दुग्धव्यवसाय क्षेत्राने वार्षिक 6.6 टक्के दराने प्रगती केली आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेले सहकार मंत्रालय, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ (एनडीडीबी ) आणि पशुसंवर्धन विभाग देशातील 2 लाख पंचायतींमध्ये ग्रामीण डेअरी स्थापन करतील आणि त्यानंतर दुग्धव्यवसाय क्षेत्राचा विकास दर 13.80 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असे ते म्हणाले. आपली दूध प्रक्रिया क्षमता प्रतिदिन 126 दशलक्ष लिटर असून जगात सर्वाधिक आहे, असे सांगत आपण आपल्या एकूण दुधाच्या उत्पादनापैकी 22 टक्के उत्पादनावर प्रक्रिया करतो, ज्याचा फायदा शेतकर्यांना वाढीव उत्पन्नाच्या रूपात होतो, असे शहा यांनी सांगितले. दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीतही दूध भुकटी , लोणी आणि तूप यांसारख्या उत्पादनांचा मोठा वाटा आहे आणि यामध्ये प्रचंड क्षमता आहे,असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निर्यातीसाठी बहुराज्य सहकारी संस्थेची स्थापना केली असून यामुळे 2 लाख ग्रामीण डेअरींना जोडून निर्यातीत 5 पटीने वाढ होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

जगात दुग्धव्यवसाय क्षेत्राची स्थिती पाहता, 1970 मध्ये भारतात दररोज 6 कोटी लिटर दुधाचे उत्पादन होत असे आणि तो दुधाची कमतरता असलेला देश होता, असे केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले. 2022 मध्ये हे उत्पादन 58 कोटी लिटर प्रतिदिन झाले आहे आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राने यात मोठी भूमिका बजावली आहे, असे त्यांनी नमूद केले. 1970 ते 2022 या कालावधीत भारताची लोकसंख्या 4 पट वाढली आहे तर दुधाचे उत्पादन 10 पटीने वाढले आहे. 1970 मध्ये देशात दुधाचा दरडोई वापर 107 ग्रॅम होता, तो आज 427 ग्रॅम प्रति व्यक्ती झाला आहे, जो जागतिक सरासरी 300 ग्रॅमपेक्षा जास्त आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी कोणतीही संधी वाया घालवणार नाही असे सांगत भारत जगातील सर्वात मोठा दूध निर्यातदार म्हणून उदयास यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे शहा यांनी सांगितले.

आज भारताचा दूध उत्पादनातील वाटा 21 टक्क्यांवर पोहोचला आहे आणि यामध्ये अमूल मॉडेलचे मोठे योगदान आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या 360-अंशातील विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले. देशात 2 लाख प्राथमिक दूध उत्पादक संघांची निर्मिती झाल्यानंतर जगातील 33 टक्के दूध उत्पादन भारतात होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार, राज्य सरकारे आणि सहकार चळवळीला एकत्र काम करावे लागेल, असे शहा यांनी सांगितले. दुग्धोत्पादन तसेच दुग्ध प्रक्रिया उपकरणांच्या क्षेत्रात भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनली पाहिजे.2033-34 पर्यंत भारताने दरवर्षी 330 एमएमटी दूध उत्पादनासह जगातील 33 टक्के दुधाचे उत्पादन केले पाहिजे, या उद्दिष्टासह आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे, असे शहा यांनी यावेळी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande