श्री अन्नची मोहीम देशातील 2.5 कोटी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल - पंतप्रधान
नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : भारताचे भरडधान्य अभियान - श्री अन्नची मोहीम देशातील 2.5 कोटी शेतकऱ्य
मोदी


नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : भारताचे भरडधान्य अभियान - श्री अन्नची मोहीम देशातील 2.5 कोटी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने भरडधान्य पिकवणाऱ्या 2.5 कोटी छोट्या शेतकऱ्यांची काळजी घेतली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जागतिक भरडधान्य श्री अन्न परिषदेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नवी दिल्लीत पुसा येथे सुब्रमण्यम हॉल, एन ए एस सी कॉम्प्लेक्स, आय ए आर आय कॅम्पस येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या दोन दिवसीय जागतिक परिषदेत भरडधान्य म्हणजेच श्री अन्नाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बाबींवर सत्रे होतील. भरड धान्याचा प्रसार उत्पादक, ग्राहक, आणि इतर संबंधितांमध्ये त्याबद्दल जागरूकता, भरड धान्य मूल्य साखळीचा विकास, भरड धान्य यांचा आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टीने महत्त्व, बाजारपेठ संलग्नता, संशोधन आणि विकास इत्यादी महत्त्वाच्या बाबींवर या परिषदेत सत्रे आयोजित केली आहेत.

पंतप्रधानांनी प्रदर्शन तथा विक्रेता ग्राहक संमेलन दालनाचे उद्घाटन केले आणि त्याला भेट दिली. त्यांनी विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचेही अनावरण केले. त्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भरड धान्यांचे (श्री अन्न) संकलन स्टार्टअप तसेच भरडधान्य म्हणजेच श्रीअन्न यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी त्यांचे प्रसंगानुरूप संदेश पाठवले. इथियोपियाच्या राष्ट्राध्यक्ष सेहेलवर्क झैदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन केले आहे. सध्याच्या काळात लोकांची भूक भागवण्यासाठी भरड धान्य हा किफायतशीर आणि पोषक पर्याय आहे असे त्या म्हणाल्या. इथियोपिया हा सहारन म्हणजेच सहारा खंडातील महत्त्वाचा भरड धान्य उत्पादक देश आहे. भरड धान्यांचे उत्पादन घेण्यासाठी लक्षवेधक धोरण आणि ही पिके घेताना संबंधित पर्यावरणाच्या संदर्भात त्यांची शाश्वतता अभ्यासणे या संदर्भात या कार्यक्रमाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं.

गयानाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम मोहम्मद इरफान अली म्हणाले की, भरड धान्याच्या बाबतीत भारताकडे जागतिक नेतृत्व आले आहे आणि हे नेतृत्व करताना याबाबतीतले आपले कौशल्य त्यांनी संपूर्ण जगासाठी वापरले पाहिजे. आंतरराष्ट्रीय भरड धान्याचे वर्ष याचे यश हे शाश्वत विकासाचे लक्ष साध्य करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि प्रदीर्घ ठरणार आहे. अन्नसुरक्षा या संदर्भात भरडधान्य हा महत्त्वाचा घटक आहे हे गयानाला कळले आहे असे त्यांनी कळवले आहे. भरड धान्यांचे पुरेसे उत्पादन घेण्यासाठी भारताचे सहयोग करण्याच्या दृष्टीने गयाना याकडे बघत आहे, त्यासाठी फक्त भरड धान्य उत्पादनासाठी दोनशे एकर जमीन गयाना निश्चित करत आहे. या जमिनीत भरड धान्यांच्या उत्पादनासाठी भारताने तंत्रज्ञान, मार्गदर्शन आणि तंत्र सहाय्य पुरवावे.

याप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधानांनी जागतिक भरडधान्य परिषद आयोजित करणाऱ्या संस्थांमधील प्रत्येकाचे अभिनंदन केले. असे कार्यक्रम फक्त जागतिक पातळीवर उत्कृष्ट बाब म्हणूनच नव्हे तर ह्या बाबतीतील भारताचे जबाबदारीची निदर्शक बाब आहे असे ते म्हणाले. निश्चयाचे योग्य परिणामात रूपांतर करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी भारताच्या सलग प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रांनी वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केल्याचा पुनरुच्चार केला. जगाने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरा करण्याच्या दिशेने भारताचे मोहीम हे महत्त्वाचे पाऊल होते याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भरड धान्याचे शेती भरड धान्यांचे अर्थव्यवस्था आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदे आणि शेतकऱ्याचे उत्पन्न, अशा अनेक विषयांवर चाललेल्या सत्रांमध्ये ग्रामपंचायती, कृषी केंद्रे, शाळा, महाविद्यालये आणि शेतकी विद्यापीठे भारतीय वकिलाती आणि अनेक परदेशी देश यांच्या सहभागातून विचार प्रवर्तक चर्चा चालल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाशी 75 लाखांहून अधिक शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जोडलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी पंतप्रधानांनी याप्रसंगी काढलेल्या विशेष नाणे आणि टपाल तिकीट यांचे अनावरण केले. तसेच ICAR च्या भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेला जागतिक उत्कृष्टता केंद्र म्हणून घोषित केले.

पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांना त्या ठिकाणी असलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन भरड धान्य शेती सर्व परिमाणे जाणून घेण्यास सांगितले. कडधान्यांशी संबंधित संस्थांना तसेच शेतीला मदत करणाऱ्या स्टार्ट अप्स आणल्याबद्दल त्यांनी युवा वर्गाचे कौतुक केले भारताचे भरड धान्यांच्या प्रति असलेली कटीबद्धता याचे हे निदर्शक आहे असे त्यांनी सांगितले.

भारत ज्याला आता श्री अन्न म्हणतो त्या भरडधान्यांसाठीच्या भारताच्या ब्रँडिंग उपक्रमांबद्दल पंतप्रधानांनी परदेशी प्रतिनिधींना माहिती दिली. श्री अन्न हे केवळ अन्न किंवा शेतीपुरते मर्यादित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय परंपरेशी परिचित असलेल्यांना कोणत्याही गोष्टीपूर्वी श्री हा उपसर्ग लावण्याचे महत्त्व समजू शकेल. श्री अन्न हे भारतातील सर्वांगीण विकासाचे माध्यम बनत आहे. हे गाव तसेच गरीब (गाव आणि गरीब) यांच्याशी जोडलेले आहे.” श्री अन्न- देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे द्वार, श्री अन्न- कोट्यवधी देशवासीयांच्या पोषणाचा आधारस्तंभ, श्री अन्न-आदिवासी समाजाचा सन्मान, श्री अन्न- कमी पाण्यात जास्त पिके घेणे, श्री अन्न- रसायनमुक्त शेतीचा एक मोठा पाया, श्री अन्न - हवामान बदलाविरोधातील लढ्यासाठी एक मोठी मदत,” असे त्यांनी नमूद केले.

श्री अन्नला जागतिक चळवळीत रूपांतरित करण्यासाठी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी माहिती दिली की, भरडधान्यांना 2018 मध्ये पोषक तृणधान्ये म्हणून घोषित करण्यात आले या दिशेने शेतकऱ्यांना त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यापासून ते बाजारपेठेत स्वारस्य निर्माण करण्यापर्यंत सर्व स्तरांवर काम केले गेले. देशातील 12-13 विविध राज्यांमध्ये भरडधान्याची प्रामुख्याने लागवड केली जाते, मात्र इथे भरडधान्यांचा प्रति व्यक्ती प्रति महिना घरगुती वापर 3 किलोग्रॅमपेक्षा जास्त नव्हता, तर आज हा वापर वाढून 14 किलोग्रॅम प्रति महिना झाला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भरडधान्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या विक्रीतही अंदाजे 30% वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. भरडधान्यांच्या पाककृतींसाठी समर्पित समाजमाध्यम वाहिन्यांशिवाय मिलेट कॅफेची स्थापनाही त्यांनी नमूद केली. “एक जिल्हा, एक उत्पादन” योजनेअंतर्गत देशातील 19 जिल्ह्यांमध्ये भरडधान्यांची देखील निवड करण्यात आली आली आहे,” असे मोदी यांनी सांगितले.

भारतातील भरडधान्यांच्या उत्पादनात सुमारे 2.5 कोटी छोटे शेतकरी थेट गुंतलेले असल्याची माहिती देत, या शेतकऱ्यांकडे अत्यंत कमी जमीन असूनही त्यांनी हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना केला असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भरडधान्य आता प्रक्रिया केलेल्या आणि पॅक केलेल्या खाद्यपदार्थांद्वारे दुकाने आणि बाजारपेठेत पोहोचत असल्याचे सांगत, श्री अन्न बाजारपेठेला चालना मिळाल्यावर या 2.5 कोटी छोट्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.गेल्या काही वर्षांत श्री अन्न संदर्भात कार्यरत 500 हून अधिक स्टार्टअप्स सुरु झाले आहेत आणि मोठ्या संख्येने एफपीओही पुढे येत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. देशात एक अशाप्रकारची संपूर्ण पुरवठा साखळी विकसित केली जात आहे जिथे लहान गावातील बचत गटातील महिला भरडधान्यांपासून जी उत्पादने बनवत आहेत त्यांचा मॉल्स आणि सुपरमार्केटमध्ये प्रवेश होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जी -20 अध्यक्षपदासाठीचे एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हे भारताचे ब्रीदवाक्य अधोरेखित करत, संपूर्ण जगाला एक कुटुंब मानणे हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षातही प्रतिबिंबित होत आहे , यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “भारताने नेहमीच जगाप्रती कर्तव्याची भावना आणि मानवतेची सेवा करण्याच्या संकल्पाला प्राधान्य दिले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योगाभ्यासाचे फायदे संपूर्ण जगापर्यंत पोहोचतील हे भारताने सुनिश्चित केले आहे, असे पंतप्रधानांनी योगाभ्यासाचे उदाहरण देताना सांगितले. आज जगातील 100 हून अधिक देशांमध्ये योगाभ्यांसाचा प्रचार केला जात आहे आणि जगातील 30 हून अधिक देशांनी आयुर्वेदालाही मान्यता दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवर प्रकाश टाकत ही आघाडी शाश्वत पृथ्वीसाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून काम करत असून 100 हून अधिक देश या चळवळीत सहभागी झाले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

“पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी लाईफ (LiFE) अभियानाचे नेतृत्व करणे असो किंवा हवामान बदलाची उद्दिष्टे निर्धारित वेळेपूर्वी साध्य करणे असो, भारत आपल्या वारशातून प्रेरणा घेतो, समाजात बदल घडवून आणतो आणि याला जागतिक कल्याणापर्यंत घेऊन जातो”, आज भारताच्या ‘भरडधान्य चळवळीमध्येही हाच प्रभाव दिसून येतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतातील विविध प्रांतात प्रचलित असलेल्या ज्वारी, बाजरी, नाचणी, सामा, कांगणी, चिना, कोडोन, कुटकी आणि कुट्टू या श्री अन्नाची उदाहरणे देत, भरडधान्य ही शतकानुशतके भारतातील जीवनशैलीचा एक भाग आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. इतर देशांकडून शिकत असतानाच भारताला आपल्या कृषी पद्धती आणि श्री अन्नाशी संबंधित अनुभव जगाला सांगायचे आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी येथे उपस्थित असलेल्या मित्र राष्ट्रांच्या कृषी मंत्र्यांना या दिशेने एक स्थिर यंत्रणा विकसित करण्याची विशेष विनंती केली तसेच शेतापासून बाजारपेठेपर्यंत आणि एका देशातून दुसऱ्या देशापर्यंत नवीन पुरवठा साखळी विकसित करणे ही सामायिक जबाबदारी आहे यावर त्यांनी भर दिला.

कोणत्याही हवामानाशी सुसंगत असलेली भरडधान्यांची क्षमताही पंतप्रधानांनी अधोरेखित केली. प्रतिकूल हवामानातही याचे उत्पादन सहजपणे घेतले जाऊ शकते, याची माहिती त्यांनी दिली. भरडधान्याच्या उत्पादनासाठी पाणी कमी लागत असल्यामुळे पाणी टंचाई असलेल्या भागात हे एक पसंतीचे पीक आहे अशी माहिती त्यांनी दिली. भरडधान्य रसायनांशिवाय नैसर्गिकरीत्या पिकवता येते आणि त्यामुळे मानव आणि माती या दोघांच्याही आरोग्याचे रक्षण होते, असेही त्यांनी नमूद केले. आजच्या जगाला भेडसावणाऱ्या अन्नसुरक्षेच्या आव्हानांना स्पर्श करून, पंतप्रधानांनी ग्लोबल साउथमधील गरिबांसाठी अन्न सुरक्षेचे आव्हान आणि ग्लोबल नॉर्थमधील अन्न सवयींशी संबंधित आजारांवर प्रकाश टाकला. उत्पादनात रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. श्री अन्न अशा प्रत्येक समस्येवर उपाय देतात कारण ते पिकवणे सोपे आहे, त्यात त्याचा खर्चही कमी आहे आणि इतर पिकांपेक्षा याचे उत्पादन लवकर होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले पंतप्रधानांनी श्री अन्नाचे अनेक फायदे सांगत हे हे पोषणाने समृद्ध आहे, विशिष्ट चव आहे, फायबरचे प्रमाण जास्त आहे, शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि जीवनशैलीशी संबंधित आजार टाळण्यास मदत करते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

भरडधान्य त्यांच्यासोबत अनंत शक्यता घेऊन येते, असे पंतप्रधान म्हणाले. भारतातील राष्ट्रीय अन्न बास्केटमध्ये श्रीअन्नाचे योगदान केवळ 5-6 टक्के आहे, अशी माहिती देऊन पंतप्रधानांनी हे योगदान वाढवण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना केले आणि दरवर्षी साध्य करता येतील अशी लक्ष्ये निश्चित करण्याची सूचना केली. अन्न प्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यासाठी देशाने पीएलआय योजनाही सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले. भरडधान्य क्षेत्राला पीएलआयचा जास्तीत जास्त लाभ मिळावा आणि भरडधान्य उत्पादनांसाठी अधिक कंपन्या पुढे याव्यात याची काळजी घेण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधआन पुढे असेही म्हणाले की, अनेक राज्यांनी त्यांच्या सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत (PDS) श्री अन्नाचा समावेश केला आहे आणि इतर राज्यांनीही त्याचे पालन करावे असे सुचवले. तसेच माध्यान्ह भोजनात श्री अन्नाचा समावेश करण्याची सूचना केली जेणेकरून मुलांना योग्य पोषण मिळावे तसेच अन्नामध्ये नवीन चव आणि विविधता वाढेल.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होईल आणि याच्या अंमलबजावणीसाठी एक सविस्तर आराखडा देखील तयार केला जाईल. शेतकरी आणि सर्व भागधारकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे, अन्न भारताच्या आणि जगाच्या समृद्धीला एक नवीन चमक देईल, पंतप्रधानांनी समारोप केला.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस. जयशंकर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी आणि श्रीमती शोभा करंदळाजे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

भारताच्या प्रस्तावावर आधारित, 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (IYM) म्हणून घोषित केले. IYM 2023 च्या उत्सवांना 'लोक चळवळ' बनवण्याच्या आणि भारताला 'भरडधान्याचे जागतिक केंद्र' म्हणून स्थान देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, केंद्र सरकारचे सर्व मंत्रालये/विभाग,राज्ये/केंद्रशासित प्रदेश, शेतकरी, स्टार्ट-अप, निर्यातदार, किरकोळ व्यवसाय आणि अन्य भागीदार भरडधान्याच्या (श्री अन्न) फायद्यांबाबत प्रचार आणि जागरूकतेत व्यस्त आहेत. भारतातील ग्लोबल मिलेट्स (श्री अन्न) परिषदेचे आयोजन हा या संदर्भात महत्त्वाचा कार्यक्रम आहे.

दोन दिवसीय जागतिक परिषदेत भरडधान्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सत्रे असतील (श्री अन्न) उत्पादक, ग्राहक आणि इतर भागधारकांमध्ये भरडधान्याचा प्रचार आणि जागरूकता; भरडधान्य मूल्य साखळी विकास; भरडधान्याचे आरोग्य आणि पौष्टिकतेसंदर्भातील पैलू; बाजार संबंध; संशोधन आणि विकास यासंदर्भात चर्चा होणार आहे. परिषदेला विविध देशांचे कृषी मंत्री, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, पोषणतज्ज्ञ, आरोग्य तज्ज्ञ, स्टार्टअप क्षेत्र आणि इतर भागधारक उपस्थित आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande