कोल्हापूर, १८ मार्च (हिं.स.) : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे शनिवारी सकाळी कोल्हापूरात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी ३०० च्या वर चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. मराठी चित्रपट सृष्टीत सहाय्यक भूमिकेने कुलकर्णी यांनी छाप सोडली होती.
कुलकर्णी यांचा जन्म २९ जुलै १९३५ रोजी झाला. प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या शाळेत त्यांनी जवळपास ३५ वर्षे नोकरी केली. शिक्षक ते चरित्र अभिनेता यावर आधारित मी एक शिक्षक-एक विदूषक हा नाट्यप्रयोग केला. त्यांना नाटकाची आवड होती. त्यांनी स्वतःची मधू थिएटर्स या नावाने नाट्य संस्था काढली होती. जवळपास १५ वर्षे त्या संस्थेचे काम सुरू होते. त्यांनी लोकनाट्यात कामे केली.
साधा चित्रकर्मी, कलासंपन्न नाट्यकर्मी, लोककला अभ्यासक, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, गीतकार अशी भालचंद्र कुलकर्णी यांची ओळख होती. कोल्हापुरात चित्रीकरण झालेल्या काही हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वाचे मोठे नुकसान झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांनी अनेक सिनेमांध्ये महत्त्वाची भूमिका साकारली एवढंच नाही त्यांची काही गाणी देखील प्रचंड गाजली. ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘माहेरची साडी’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘शिवरायांची सून’, ‘जावयाची जात’, ‘मर्दानी’, ‘मासूम’, ‘झुंज तुझी माझी’, ‘नवरा नको गं बाई’, ‘पिंजरा’, ‘थरथराट’, ‘मुंबईचा जावई’ ‘सोंगाड्या’, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. तब्बल पाच दशके कुलकर्णी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांनी जुन्या मराठी चित्रपटांचा समृद्ध काळ जवळून बघितला आहे. याशिवाय डॉ. श्रीराम लागू, लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी अभिनय केला. पण गेल्या अनेक वर्षांपासून भालचंद्र कुलकर्णी रुपेरी पडद्यापासून दूर होते.
कोल्हापूरातील खाजगी महाविद्यालयात शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. राजर्षी छत्रपती शाहू मालिकेसह अनेक टीव्ही मालिकांतही त्यांनी काम केले होते. अतिशय साधी राहणी असलेल्या कुलकर्णी यांनी चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. कोणतीही भूमिका दिली तरी ती अतिशय सुबकतेने करण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काही वर्षे सचिव, तर अनेक वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्रभूषण पुरस्कार देण्यात आला होता. कुलकर्णी यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते.
हिंदुस्थान समाचार