छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.) जीवे मारण्याचा प्रयत्न, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल गुन्हा आणि न्यायालयात दाखल करण्यात आलेले दोषारोपपत्र रद्द करावे यासाठी करुणा अशोक शर्मा ऊर्फ करुणा धनंजय मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला आहे. याचिकेवर नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती एम.एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावून १३ एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकरणात करुणा शर्मा ऊर्फ करुणा मुंडे यांनी अॅड. संदीप आंधळे आणि अॅड. कल्याण खोले पाटील यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. त्यानूससार, याचिकाकर्ती यांनी सन २०२१ रोजी फेसबुक लाईव्ह व्दारे ५ सप्टेंबर २०२१ रोजी परळी वैजनाथ येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी याचिकाकर्ती या परळी वैजनाथ मंदिरामध्ये गेल्या होत्या. दाखल तक्रारीनुसार, तेथे याचिकाकर्तीने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली तर आरोपी मोरे याने फिर्यादी यांच्याबरोबर असलेल्या व्यक्तीवर चाकुहल्ला चढवला. प्रकरणात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी परळी वैजनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यात याचिकाकर्तीसह इतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपींना जामीन मंजूर झाला. गुन्ह्यात साक्षीदारांचे जबाब प्रथम वर्ग न्याययदंडाधिकारी यांच्यासमोर नोंदविण्यात आले. त्यानंतर गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यावर दाखल गुन्हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असून गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करावे यासाठी याचिकाकर्तीने खंडपीठात धाव घेतली आहे.
हिंदुस्थान समाचार