नीरज चोप्राच्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरिना येथील प्रशिक्षण खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता
नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.) : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या (एमवायएएस) मिशन ऑलिम्पिक सेलने
नीरज चोप्रा


नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.) : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या (एमवायएएस) मिशन ऑलिम्पिक सेलने (एमओसी) ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या तुर्कीतील ग्लोरिया स्पोर्ट्स एरिना येथे 61 दिवसांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली.

टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) निधी अंतर्गत, गेल्या वर्षी देखील ग्लोरिया स्पोर्ट्स एरिना येथे प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नीरज चोप्रा यावर्षी 1 एप्रिल रोजी तुर्कीला जाणार असून 31 मे पर्यंत त्याचे तिथे वास्तव्य असेल.

टॉप्स निधीमध्ये नीरज, त्याचे प्रशिक्षक क्लॉस बारटोनिट्झ आणि त्याच्या फिजिओथेरपिस्टचे विमानाचे तिकीट, भोजन आणि वास्तव्याचा खर्च, वैद्यकीय विमा आणि स्थानिक वाहतूक खर्च यांचा समावेश असेल.

बैठकीदरम्यान एमओसी सदस्यांनी मंजूर केलेल्या इतर महत्त्वपूर्ण प्रस्तावांमध्ये गोल्फ सेट उपकरणे खरेदीसाठी आर्थिक सहाय्य आणि वैयक्तिक प्रशिक्षकाची नियुक्ती, कर्णबधिरांसाठीच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेती दिक्षा डागरसाठी फिटनेस आणि पोषण प्रशिक्षक आणि स्विस ओपन, स्पेन मास्टर्स आणि ऑर्लीन्स मास्टर्समध्ये सहभागाकरिता बॅडमिंटनपटू प्रियांशू राजवतला आणि ऑर्लेन पोलिश ओपन आणि स्लोव्हेनिया योनेक्स ओपनमध्ये भाग घेण्यासाठी बॅडमिंटनपटू शंकर मुथुसामीला आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande