कुवेतमधील भारतीय महोत्सव उभय देशांमधील महत्वपूर्ण सांस्कृतिक संबंध दृढ करेल : मीनाक्षी लेखी
नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.) : कुवेतमधील भारतीय महोत्सवामुळे दोन्ही देशांमधील महत्वपूर्ण सांस्कृतिक
भारतीय महोत्सव


नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.) : कुवेतमधील भारतीय महोत्सवामुळे दोन्ही देशांमधील महत्वपूर्ण सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी व्यक्त केला. कुवेतमधील “भारतीय महोत्सव” कार्यक्रमाचे नुकतेच दृकश्राव्य माध्यमातून उद्घाटन झाले. त्यात त्या बोलत होत्या. समारंभाला संबोधित करताना त्यांनी भारत आणि कुवेतमधील मजबूत ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला आणि भारत आणि कुवेत दरम्यान सुरू असलेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचे देखील कौतुक केले.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पाठवलेल्या नामवंत भारतीय सांस्कृतिक मंडळांनी केलेले सादरीकरण हे महोत्सवाचे खास आकर्षण होते. महोत्सवात सादरीकरण केलेली तीन मंडळे; (i) कुत्बी ब्रदर्स - कव्वाली सादरीकरण, (ii) हसन खान आणि चमू - राजस्थानी लोककला, आणि (iii) अनिरुद्ध वर्मा कलेक्टिव्ह - भारतीय शास्त्रीय आणि समकालीन संगीताचे फ्यूजन. या मंडळांनी भारतातील विविध प्रदेश, संस्कृती आणि धर्मांच्या माध्यमातून केलेल्या सादरीकरणाद्वारे भारताच्या एकत्रित सभ्यतेचे चित्र रेखाटले.

कुवेत मध्ये 17-18 मार्च या कालावधीत कुवेतच्या भारतीय दूतावासाने, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या विशेष मदतीने भारतीय महोत्सवाचे आयोजन केले होते. कोविड-19 महामारीनंतर परदेशात सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेला हा पहिला भारतीय महोत्सव होता. या महोत्सवाला कुवेतच्या माहिती आणि सांस्कृतिक मंत्रालय आणि राष्ट्रीय संस्कृती, कला आणि साहित्य (एनसीसीएल) परिषदेचे पाठबळ लाभले. 18 मार्च रोजी दार अल अथर इस्लामिया (DAI), यार्मौक सांस्कृतिक केंद्रात सांगता सोहोळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कुवैती स्नेहीजन आणि भारतीय समुदायाची मोठी उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच, कुवेतच्या भारतीय दूतावासाने 18 मार्च रोजी कुवेती स्नेही आणि राजनयिक समुदायासाठी ‘अतुल्य भारत – पर्यटन प्रदर्शन’ आणि भारतीय कॉफीचा आस्वाद या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande