जालना:अंबड शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
एकूण 6 लाख 3 हजाराचा मुद्देमाल लंपास जालना, 21 मार्च (हिं.स.) :अंबड शहरात दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाक
जालना:अंबड शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ


एकूण 6 लाख 3 हजाराचा मुद्देमाल लंपास

जालना, 21 मार्च (हिं.स.) :अंबड शहरात दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यांच्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनही हादरले आहे. दरोडेखोरांनी या घटनांमध्ये जवळपास 6 लाख 3 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर अडीच ते पावने तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे अंबड पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

अधिक माहिती अशी की, दरोडेखोरांनी सोमवारी मध्यरात्री नंतर अंबड शहरातील पाचोड रोडवरील लक्ष्मी नगर येथील अर्जुन अंकुशराव माकोडे यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आत शिरून कपाटातील 3 हजार रूपये लंपास केले. तसेच बाजूलाच असलेल्या पत्रकार अशोक खरात यांच्या गेटचा कडी-कोयंडा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. आणि पारनेर रोडवरील मोरया हाउसिंग सोसायटी मध्ये जाऊन अॅड. सोमनाथ सातपुते यांचे चॅनल गेट तोडून वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच सर्वजण जागे झाल्याने तेथून दरोडेखोरांनी पोबारा केला. यानंतर बाजूलाच काही अंतरावर असलेल्या यशवंत नगर भागात सुमारे 2.30 ते 2.45 च्या दरम्यान जाऊन काहीजणांनी शिक्षक भाऊसाहेब रणमळे यांचा गेटचा दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगायोगाने लाकडी दरवाजाच्या आत चॅनल गेट असल्यामुळे दरोडेखोरांचा घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न असफल झाला. तसेच बाजुलाच असलेले तलाठी पावसे यांच्या घराचे लोखंडी गेट व मेन लाकडी दरवाजा तोडून 6 दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले व घराच्या आतील बाजूस दरवाज्यात आडवे झालेल्या पावसे यांच्या डोक्यात व पायावर मारून त्यांना दरोडेखोरांनी गंभीर जखमी केले. त्यांची पत्नी, मुलगी, आई यांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि कपाटातील रोख रक्कम चार लाख 50 हजार रुपये असा सहा लाख तीन हजाराचा मुद्देमाल लंपास केला.

दरम्यान सदरच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तलाठी पावसे यांना औषधोपचारासाठी जालना येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील अंबड, उपविभागीय पोलीस अधिकारी मोरे परतूर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजगुरू जालना, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. भुजंग जालना, अंबड पोलीस ठाण्याचे पो.नि. शिरीष हुंबे, फौजदार चव्हाण, पाटील, आदिनाथ ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या आदेशान्वये जवळपास आठ तपास पथक नेमण्यात आली आहेत. मंगळवारी सकाळी ठसे तज्ज्ञ, आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande