प्रदूषण कमी करण्यासाठी किफायतशीर इंधन पर्याय अत्यंत आवश्यक - गडकरी
मुंबई, 25 मे (हिं.स.) : वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण लक्षात घेता, हे प्रदूषण कमी करण्य
गडकरी


मुंबई, 25 मे (हिं.स.) : वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण लक्षात घेता, हे प्रदूषण कमी करण्यासाठी आर्थिक व्यवहार्यतेच्या दृष्टीने किफायतशीर इंधन पर्याय शोधणे आणि त्याचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मुंबईत हायड्रोजनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एनसर्कल सर्व्हिसेसच्या वतीनें आयोजित हरित हायड्रोजन कॉन्क्लेव्ह जीएच 2 चे उद्घाटन केल्यानंतर गडकरी बोलत होते.

बायो सीएनजी, हरित हायड्रोजन सारख्या पर्यायी इंधनांमुळे प्रदूषण कमी व्हायला मदतच तर होतेच यासह इंधन खर्चतही मोठी बचत होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही इंधने लोकांना किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या क्षेत्रातील संबंधितांची असून या इंधनांच्या वापराबाबत सामान्य नागरिकांमध्ये जाणीव जागृती होते आवश्यक असल्याचे गडकरी यांनी सांगितले. हरित हायड्रोजनची किंमत जास्त असेल, तर ते उपयुक्त ठरणार नाही त्यामुळे हे दर कमी राहतील याकडे संबंधितांनी लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्याकडे मोठ्या प्राणात कचरा निर्माण होतो त्यातून संपत्ती निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिले असे ते म्हणाले.

प्रदूषणासह जिवाश्म इंधनांची होणारी लाखो कोटींची आयात ही देखील चिंतेची बाब आहे. देशात हवेसह पाणी आणि ध्वनी प्रदूषणाची समस्यां मोठी आहे त्यामुळे आयातीला पर्याय देणारी, किफायतशीर, प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण स्नेही स्वदेशी उत्पादनांची अधिकाधिक निर्मिती झाल्यास आत्मनिर्भर भारताचा आणि पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. आपण औष्णिक ऊर्जा, जल विद्युत, पवन उर्जा इत्यादींवर खूप वेगाने काम करत आहोत पण त्याच वेळी आपण अणु ऊर्जेकडे देखील लक्ष ठेवले पाहिले असे गडकरी यांनी नमूद केले. तंत्रज्ञानासह अन्य बाबींचा विचार करताना तळागाळासह ग्रामीण भागाकडेही लक्ष केंद्रित केले पाहिले असे ते म्हणाले.कृषी आणि ऊर्जा क्षेत्र ही काळाची गरज आहे. जर आपण शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली आणि शेतीला उर्जा क्षेत्राशी जोडले तर आपण अनेक रोजगार निर्माण करू शकतो, असे गडकरी म्हणाले.

यावेळी जपान, जर्मनी आणि नॉर्वे चे प्रतिनिधी आणि महावाणिज्यदूत यांच्यासह या क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande