महिलांनी त्यांच्यातील असीम शक्ती जागृत करावी - राष्ट्रपती
रांची, 25 मे (हिं.स.) : महिलांनी सामाजिक सुधारणा, राजकारण, अर्थव्यवस्था, शिक्षण, विज्ञान आणि संशोधन,
President murmu


रांची, 25 मे (हिं.स.) : महिलांनी सामाजिक सुधारणा, राजकारण, अर्थव्यवस्था, शिक्षण, विज्ञान आणि संशोधन, व्यवसाय, क्रीडा आणि सैन्य दल आणि इतर अनेक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महिलांनी स्वतःचे कलागुण ओळखणे आणि इतरांशी स्वतःची तुलना न करणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांनी त्यांच्यातील असीम शक्ती जागृत करावे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. आज झारखंडच्या खुंटी येथे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या महिला परिषदेला उपस्थित राहून त्यांना संबोधित केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या, आपल्या देशात महिलांच्या योगदानाची असंख्य प्रेरणादायी उदाहरणे आहेत. महिला सक्षमीकरणाचे सामाजिक आणि आर्थिक दोन्ही पैलू तितकेच महत्त्वाचे असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. त्या म्हणाल्या की, झारखंडच्या कष्टकरी बहिणी आणि मुली राज्याच्या अर्थव्यवस्थेत तसेच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम आहेत. त्यांनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, महिला शक्ती झारखंडच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला ऊर्जा पुरवते. त्यामुळे झारखंडमधील अधिकाधिक महिलांना स्वयं-सहायता गटांशी जोडणे आणि त्यांना त्यांच्या कौशल्य विकासाद्वारे रोजगार उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून महिलांना त्यांचे हक्क आणि त्यांच्या हितासाठी शासनाच्या विविध योजनांची जाणीव होईल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आदिवासी समाज अनेक क्षेत्रात आदर्श अशी उदाहरणे प्रस्थापित करतो. यापैकी एक म्हणजे आदिवासी समाजात हुंड्याची प्रथा नाही. आपल्या समाजातील अनेक लोक, अगदी सुशिक्षित लोक देखील आजपर्यंत हुंडा प्रथा सोडू शकलेले नाहीत, हे देखील त्यांनी अधोरेखित केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande