देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत लष्कर आवश्यक - संरक्षण मंत्री
नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.) : देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत लष्कर महत्त्व
राजनाथ सिंह


नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.) : देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत लष्कर महत्त्वाचे आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. नवी दिल्ली येथे आज (25 मे) दोन दिवसीय डीआरडीओ- शैक्षणिक संस्थांच्या संमेलनाचे उद्घाटन करताना राजनाथ सिंह यांनी भारतासारख्या देशासाठी सीमेवर दुहेरी धोक्याचा सामना करताना असे लष्कर असणे अत्यावश्यक असल्यावर भर दिला.

“आज आपण जगातील सर्वात मोठ्या सशस्त्र दलांपैकी एक आहोत, आपल्या सैन्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे जगभरात कौतुक होत आहे. जगभरातील देशांनी आपल्या सशस्त्र दलांसोबत संयुक्त सराव आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत लष्कर असणे अत्यावश्यक आहे. भारतासारख्या देशासाठी हे खूप महत्वाचे आहे कारण आपल्या सीमेवर आपल्याला दुहेरी धोक्याचा सामना करावा लागत आहे,” असे संरक्षण मंत्री म्हणाले.

डीआरडीओ-अकॅडेमिया भागीदारी - संधी आणि आव्हाने या संमेलनाच्या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करताना, राजनाथ सिंह म्हणाले की, 21 व्या शतकात आपल्याला भेडसावत असलेल्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी डीआरडीओ आणि शैक्षणिक संस्थांनी एकमेकांबरोबर भागीदारीत काम करण्याची नितांत गरज आहे. ही भागीदारी भारताला संरक्षण तंत्रज्ञानातील आघाडीचे राष्ट्र बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा मार्ग संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून जातो जो कोणत्याही देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो असे संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले .

“जोपर्यंत आपण संशोधन करत नाही तोपर्यंत आपण नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकणार नाही. सामान्य पदार्थांचे मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता संशोधन आणि विकासात आहे .संपूर्ण इतिहासात संस्कृतीच्या विकासात हा एक महत्त्वाचा घटक आहे,” असे राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की डीआरडीओ आणि शिक्षण क्षेत्रातील भागीदारी नव्या शिखरावर पोहोचत असताना, या भागीदारीची फळे अनेक नवीन संसाधनांची क्षमता समोर आणतील, ज्याचा संपूर्ण देशाला फायदा होईल.

“मी डीआरडीओ आणि शैक्षणिक संस्थांमधील भागीदारीकडे 1 1=2 च्या दृष्टिकोनातून पाहत नाही, तर 1 1=11 या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजेच जेव्हा या दोन संस्था एकमेकांना सहकार्य करतील, तेव्हा केवळ दोघांनाच दुहेरी फायदा होणार नाही तर संपूर्ण देशाला या भागीदारीचा मोठा फायदा होईल,” असे राजनाथ सिंह म्हणाले.

डीआरडीओ- शैक्षणिक संस्थांच्या भागीदारीच्या लाभांविषयी माहिती देताना, संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले की, या समन्वयातून, डीआरडीओला देशभरातील आयआयएससी, आयआयटी, एनआयटी आणि इतर विद्यापीठांसारख्या प्रख्यात संस्थांकडून एक कुशल मनुष्यबळ मिळेल कारण या संस्था मोठ्या संख्येने प्रतिभावान आणि कुशल तरुण घडवतात.

“दुसरीकडे, शैक्षणिक संस्थांना डीआरडीओच्या संशोधन आणि विकास निधीचा फायदा होईल जो ते नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी खर्च करतात तसेच संरक्षण संशोधन संस्थेच्या प्रगत पायाभूत सुविधा आणि प्रयोगशाळा सुविधा देखील त्यांना वापरायला मिळतील. हे सहयोगात्मक संबंध आपल्या देशातील स्टार्ट-अप संस्कृतीला बळ देण्यासाठी उपयुक्त ठरतील,” असे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.

सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नातून विकसित अशा तंत्रज्ञानाचा नागरी आणि संरक्षण दोन्ही क्षेत्रात उपयोग होऊ शकतो यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला.

संरक्षण मंत्र्यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना विशिष्ट कालावधीसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून तैनात करण्याच्या पर्यायावर विचारमंथन करण्याचे आवाहन डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना आणि शैक्षणिक संस्थांना केले, यामुळे आपल्या शैक्षणिक संस्थेला एक नवीन दृष्टीकोन मिळेल तसेच शैक्षणिक क्षेत्रातील बुद्धिजीवी देखील डीआरडीओ मध्ये शास्त्रज्ञ म्हणून प्रतिनियुक्तीवर सेवा देऊ शकतील.

या प्रसंगी, संरक्षण मंत्र्यांनी अनुदानित डीआरडीओ प्रकल्पांद्वारे एरोनॉटिक्स, शस्त्रास्त्रे, जीवन विज्ञान आणि नौदल प्रणाली तसेच डीआरडीओच्या इतर गरजा पूर्ण करण्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या प्रख्यात शास्त्रज्ञांचा सत्कार केला. त्यांनी डीआरडीओच्या गरजा आणि तेथील संधी समजून घेण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या क्षेत्रांवर झालेल्या चर्चेचे संकलनही प्रकाशित केले.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत, संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ जी सतीश रेड्डी , महासंचालक (तंत्रज्ञान व्यवस्थापन) हरी बाबू श्रीवास्तव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव -प्रा. आशुतोष शर्मा आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि डीआरडीओ व शैक्षणिक क्षेत्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

डीआरडीओ संचालक, शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ यांच्यातील समन्वयात्मक संवादाद्वारे डीआरडीओची गरज आणि शैक्षणिक क्षमता यांचा मेळ घालणे हे या दोन दिवसीय संमेलनाचे उद्दिष्ट आहे. या संमेलनात एक पूर्ण सत्र आणि एरोनॉटिक्स, नौदल, जीवन विज्ञान आणि शस्त्रास्त्र यांवर चार तांत्रिक सत्रे असतील. यात देशभरातील सुमारे 350 ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सहभागी होत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande