रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांना कथ्थक नृत्यातून मानवंदना
रत्नागिरी, 30 मे, (हिं. स.) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीचे औचित्य सा
सावरकरांना नृत्यातून मानवंदना


रत्नागिरी, 30 मे, (हिं. स.) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीचे औचित्य साधून येथील नटराज नृत्यवर्गातर्फे ''अनादि मी अनंत मी'' या कार्यक्रमाद्वारे नृत्यपुष्पांजली अर्पण केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतमातेच्या जयघोषात रसिकांनी अवघे सभागृह दणाणून सोडले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने रत्नागिरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नटराज नृत्यवर्गाच्या संचालिका सोनम जाधव यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यांवर आधारित साकारलेला ''अनादि मी अनंत मी'' हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम येथील रंजन मंदिरात पार पडला. सोनम जाधव आणि त्यांच्या शिष्यवर्गाने सादर केलेल्या स्वातंत्र्यवीरा तुझी आरती या वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर धगधगले अग्निकुंड, सदया गणया तार, जयदेव जयदेव जयजय शिवराया, आर्यबंधू हो उठा उठा, अनादि मी अनंत मी, ने मजसी ने परत मातृभूमीला, निरंजनासी निरंजनाला, तुम्ही आम्ही सकल हिंदू, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, शस्त्र गीत, जयोस्तुते अशा एकाहून एक सुंदर रचना सादर झाल्या. प्रसिद्ध निवेदक निबंध कानिटकर यांनी प्रत्येक गीतादरम्यान सावरकरांचे जीवनचरित्र आणि त्यांचे विचार रसिकांसमोर उलगडले. तन्वी मोरे हिने तात्याराव सावरकरांनी वहिनीला लिहिलेले जयासी तुवा प्रतिपाळिले हे पत्र गायले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन रसिकांना मानवंदना दिली तेव्हा तुडुंब भरलेल्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतमातेचा जयघोष रसिकांनी केला आणि सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात सर्व कलाकारांचे कौतुक केले.

आराध्या साऊंडचे सुरेंद्र गुडेकर, ऋषीकेश कुवळेकर आणि राज शिंदे यांनी उत्तम ध्वनिसंयोजन तसेच प्रकाशयोजना केली. पालकवर्गाचेही मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाला संगीत शिक्षक विजय रानडे, पोलिस निरीक्षक निशा जाधव, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, नृत्यगुरू शिल्पा मुंगळे, आविष्कार संस्थेच्या सुप्रिया लाड, र. ए. सोसायटीचे पदाधिकारी मनोज पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. नृत्यवर्गातर्फे सावरकरांचे पुस्तक आणि पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार

 rajesh pande