रत्नागिरी, 2 जून, (हिं. स.) : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरीत येत्या रविवारी (दि. ४ जून) शहरात सायकल फेरीचे आयोजन केले आहे.
शंभरहून अधिक सायकलिस्ट सदस्य असलेल्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने यापूर्वी रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन यशस्वी केले आहे. वर्षभराच्या कालावधीत सुमारे पंधरा उपक्रम, कार्यक्रम राबवले आहेत. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबने आत्तापर्यंत विविध उपक्रम आयोजित केले आहेत. क्लबच्या जवळपास १० हून अधिक सदस्यांनी बीआरएमसारख्या कस लावणाऱ्या स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे.
दरवर्षी ४ जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने येत्या रविवारी सायकल फेरी आयोजित केली आहे. सकाळी ७ वाजता मारुती मंदिर येथे फेरीला सुरुवात होईल. ही फेरी मांडवी किनाऱ्यापर्यंत निघेल. मारुती मंदिर, नाचणे रोड, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, रामआळी, गाडीतळ, टिळक आळी, बंदर रोड मार्गाने सायकल फेरी मांडवीपर्यंत जाईल.
सायकल फेरीच्या सांगता कार्यक्रमात सहभागी सायकलप्रेमींसाठी सायकलविषयी माहिती देण्यात येणार आहे. सायकल चालवण्याची तंत्रशुद्ध पद्धत शिकविली जाणार असून सायकलप्रेमींसाठी क्लबतर्फे काही सरप्राइजेसदेखील असणार आहेत. प्रत्येक सदस्याने महिन्याला किमान ३०० किमी आणि आठवड्याला ७५ किमी सायकलिंग करणे हे रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे आगळेवेगळे शुल्क आहे. सायकलिंगला प्रोत्साहन देणे आणि सायकलिंग वाढवणे हाच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा हेतू आहे.
रत्नागिरीतील जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी रविवारच्या फेरीत सायकल आणि पाण्याची बाटली घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डबल एसआर अमित कवितके (99705 57055), एसआर डॉ. नितीन सनगर (96898 66099), दर्शन जाधव (9970398242), महेश सावंत (बॉबी) (7744085581) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार